अबब : भलतंच धाडस, ''आली अंगावर, घेतली शिंगावर" अजस्त्र मगरीला ग्रामस्थांनी घेतले थेट खांद्यावर

अजित झळके
Wednesday, 27 January 2021

मगर दिसली की "पळा, पळा' म्हणायची वेळ येते. पण, मगरीचा धोका नेहमीच शिरावर घेऊन फिरण्यापेक्षा तिलाच जेरबंद करण्याचा धाडस प्रयत्न साटपेवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांनी केला.

सांगली :  "आली अंगावर, घेतली शिंगावर"असंच काहीसं सांगलीच्या साटपेवाडीत एका अजस्त्र मगरी बाबत घडले आहे.गावात कृष्णाकाठी मगरी आली आणि ग्रामस्थांनी तिला जेरबंद करत थेट खांद्यावरून उचलून नेऊन वन विभागाकडे सुपूर्द केल्याचा प्रकार घडला आहे,मगरीमुळे गावात अनुचित प्रकार घडू नये ,यासाठी ग्रामस्थांनी हे धाडस केलं आहे.

मगर दिसली की "पळा, पळा' म्हणायची वेळ येते. पण, मगरीचा धोका नेहमीच शिरावर घेऊन फिरण्यापेक्षा तिलाच जेरबंद करण्याचा धाडस प्रयत्न साटपेवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांनी केला. मगरीच्या डोळ्यावर पोते टाकून, तिचे तोंड बांधून मगरीला चक्क खांद्यावर उचलून घेत तिला वन विभागाच्या ताब्यात देण्याचे धाडस करण्यात आले. त्याची जिल्हाभर चर्चा होत असून साटपेवाडीकरांच्या धाडसामुळे परिसरातील लोकांनी निश्‍वास टाकला आहे.

मगरीच्या दर्शनाने गाव भेदरलं
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आली,
त्यांनतर गावातील सर्वांनी नदी काठी धाव घेतली.मगरीच्या या वावरमुळे ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले,तर ही मगर पुन्हा पात्रात गेली,तर गावात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या भावनेने ग्रामस्थांनी मगर जेरबंद करण्याचे ठरवले आणि तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दहा ते बारा फुटाची अजस्त्र मगर पकडण्यात ग्रामस्थांना यश मिळाले.

खांद्यावरून वाहून नेली अजस्त्र मगर
दरम्यान मगरी बाबत वन विभागालाही कळवण्यात आले,तर रात्रीची वेळ झाल्याने पकडण्यात आलेल्या अजस्त्र मगरील नदी काठीच जास्त काळ ठेवणे मुश्कील बनल्याने ग्रामस्थांनी मगर पुन्हा सुटून गेल्यास अवघड परिस्थिती निर्माण  होईल,या भितीने वन विभागाच्या ताब्यात देण्यासाठी मग ग्रामस्थांनी अजस्त्र मगरीला थेट खांद्यावरून घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि गावातील तरुणांनी मिळून मग अजस्त्र मगरीला खांद्यावर घेऊन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा- स्वप्नवत निसर्गचित्र अनुभवायचं तर सागरेश्‍वरला जावा

साटपेवाडीचे उपसरपंच अशोक साटपे म्हणाले, तुपारीच्या बाजूला बंधाऱ्याच्या बाजूला मगर आली होती. एक युवक मेडिकल बंद करून गावात येत असताना ती दिसली. ती पुढे जाईना म्हटल्यावर त्यांनी युवकांना फोन केला. दंगा सुरु झाला. मगर पुलाखाली निघाली. त्यावर युवकांनी तिला पकडण्याचा निर्णय घेतला. फास टाकून, पोते डोळ्यावर टाकून मगर पकडली. तिचे तोंड बांधले आणि उचलून आणून वन विभागाला फोन केला. त्यांनी मगर ताब्यात घेतली. पन्नास ते साठ तरुणांनी हे कामगिरी केली. तुपारीतील तरुणांनीही सहकार्य केले.''
पाच वर्षापूवी एक मगरीचे पिलू गावकऱ्यांनी असेच पकडले होते. त्याचा अनुभव तरुणांना होता. शिवाय, नॅशलन जिओग्राफीसारख्या चॅनेलवर मगर कशी पकडली जाते, हे पाहिलेल्या तरुणांचा अभ्यास कामाला आला, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crocodile arrested satepadi people sangli walwa marathi news