‘धोमं’च्या स्वप्नातील अभयारण्य बहरले ; उजाड माळरानाचं झाले नंदनवन 

अमोल गुरव
Wednesday, 27 January 2021

स्वप्नवत निसर्गचित्र अनुभवायचं तर सांगली जिल्ह्यातल्या सागरेश्‍वरला जायलाच हवं. देशातल्या या पहिल्या मानवनिर्मित अभयारण्याबद्दल...

सांगली : भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, झोंबणारा वारा, हिरवागार शालू परिधान केलेली धरती, पक्ष्यांचा किलबिलाट, वानरसेनेची दंगामस्ती, डोंगरांच्या कपारीतून वाहणारे छोटे-छोटे निर्झर, हरण, चितळ, काळविटांचे कळपच्या कळप असं सारं स्वप्नवत निसर्गचित्र अनुभवायचं तर सांगली जिल्ह्यातल्या सागरेश्‍वरला जायलाच हवं. देशातल्या या पहिल्या मानवनिर्मित अभयारण्याबद्दल...

सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्‍याच्या सीमेवरील सागरेश्‍वर अभयारण्य हरणांचे माहेर घर आहे. वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून साकारलेले. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं, याचं हे सुंदर उदाहरण. 
सागरेश्‍वर १९८५ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित झालं. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी हे एक. त्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौरस किलोमीटर आहे. वृक्षप्रेमी धो. म. मोहिते यांच्या ध्यासातून ते साकारले. रस्त्यावरील सागरेश्‍वराच्या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. एकीकडे माणूस स्वार्थापोटी जंगलतोड करीत असताना त्याच काळात परिश्रमपूर्वक झाडे लावून उजाड परिसराचं जंगल करण्यात आलं. ‘धोमं’च्या स्वप्नातील अभयारण्य आज बहरले आहे. उजाड माळरानाचं नंदनवन झाले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ देवराष्ट्रेत पोहोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. सागरेश्‍वर मंदिरापासून पुढे एक-दीड किलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्यानंतर अभयारण्याची सीमा सुरू होते.

बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन 
श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थानात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. येथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती, कार्तिकस्वामी, करकटस्वामी, काशी विश्‍वेश्‍वर, रामेश्‍वर, सोमेश्‍वर, त्र्यंबकेश्‍वर, भीमेश्‍वर, सत्यनाथ, ओंकारेश्‍वर, वीरभद्रेश्‍वर, विठ्ठल रुक्‍मिणी, नंदिकेश्‍वर, केदारेश्‍वर, सत्येश्‍वर, रामेश्‍वर, सिद्धेश्‍वर, धोपेश्‍वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिराबरोबरच इतर देवतांची मंदिरेही आहेत. एकूण ४७ मंदिरे व १३ ओवऱ्या आहेत. अंघोळीचे व पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी ते केव्हाच कमी होत नाही.

देशी वृक्षराजींचे माहेर
उष्ण-कोरड्या हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्षांसोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, कडूलिंबाबरोबरच चेरी, आवळा, औदुंबरसारख्या अनेक वनौषधी आहेत.  

प्राणी पाहू शकता
सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस आदी वन्यजीवांचा वावर आहे. अलीकडे बिबट्याचे एक कुटुंबही आलेय. हे पक्ष्यांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षकांचा इथं सतत वावर असतो. शुष्क गवताळ झुडपी टेकड्यांचा निवांत अधिवास. त्यामुळे इथे १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची अधिवास नोंद झाली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सूर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवट्या, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावशा, पोपट, कोकीळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध पक्ष्यांचा मेळा असतो.

फुलपाखरांचा मुक्त विहार
भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटतं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे यांचा हक्काचा निवारा आहे. अभयारण्यात वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. 

किर्लोस्कर पॉईंटचा नजारा
अभयारण्यातील किर्लोस्कर पॉईंट समुद्रसपाटीपासून ३८६० फूट उंचीवर आहे. तेथून आसमंतात नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्‍यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा दिसते. त्या पॉईंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यावर अभयारण्याच्या मध्यभागी काळभैरवाचे मंदिर लागते. त्याचे बांधकाम सातवाहन काळातील असल्याचे सांगण्यात येते. मंदिर कठीण बेसाल्टच्या दगडात कोरले असून पुरातत्त्वदृष्ट्या त्याला महत्त्व आहे. डोंगरपायथ्याशी असलेल्या ताकारीचे ते ग्रामदैवत आहे. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉईंट हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे.

सागरेश्‍वरला कसे जाल?
सागरेश्‍वर अभयारण्य मिरज रेल्वे स्थानकापासून साठ किलोमीटर, कऱ्हाडपासून तीस किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटरवर आहे. या परिसराला भेट देण्यासाठी पावसाळ्याचा काळ  अधिक चांगला आहे. अगदी अलीकडे जानेवारी २०१३ मध्ये या अभयारण्याचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्‍वर अभयारण्य असं नामकरण करण्यात आलं.

पर्यटकांसाठी 
निसर्ग माहिती केंद्र, ओपन ॲम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात. यशवंतराव चव्हाण सागरेश्‍वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांनी इथे कायमचा तळ ठोकला आहे. किर्लोस्कर पाईंट, रणशूळ पॉईंट, फेटा उडवी पॉईंट, पॅगोडा महागुंड पॉईंटवरून पंचक्रोशीचे विहंगम दृश्‍य दिसते. सूर्यास्त-सूर्योदयाचा तेथून आनंद घ्यायलाच हवा.

पर्यटकांसाठी महत्त्वाचे
 बांबू हट, शासकीय विश्रामधाम, लॉज, हॉटेल्स अशी परिसरात व्यवस्था. 
 शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात सवलत. 
 दर मंगळवारी अभयारण्य बंद असते.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sagareshwar wildlife sanctuary information by amol gurav sangli marathi news