कोल्हापूर : खोचीत धाडसी युवकांनी पकडली तब्बल नऊ फूट लांबीची मगर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 March 2021

सोमवारी रात्री 9 वाजता अचानक नऊ फूट लांबीच्या मगरीचा रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वावर दिसला

खोची - येथील खोची बंधार्‍याजवळ बाबर वस्ती येथे 9 फूट लांबीची मगर गावातील धाडसी युवकांनी पकली. मगरीपासून वस्तीवरील रहिवाशांना, जनावरे यांना होणारा पुढील अनर्थ टळला. खोची येथील धाडसी युवक सर्पमित्र तेजस जाधव, अमोल सुतार, अमर चव्हाण, अमोल मगदूम, अमोल चव्हाण(टोप), सांगली रेसक्यू टीमचे सचिन साळुंखे, विशाल चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी पकडली. मगर वस्तीजवळ सापडल्याने स्त्रिया, लहान मुले यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

खोची गावापासून तीन किलोमीटर अंतरावर कोल्हापूर- सांगली जिल्ह्याला जोडणारा खोची-दुधगांव दरम्यान वारणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यालगत येतील बाबर समाजातील नागरिकांची जनावरांसह वस्ती आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री 9 वाजता अचानक नऊ फूट लांबीच्या मगरीचा रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वावर दिसला. त्यानंतर ही माहिती गावातील नागरिकांसह धाडसी तरुणांना समजली. त्यांनी वस्तीच्या ठिकाणी धाव घेऊन मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांच्या मदतीसाठी सांगलीतील रेस्क्यू टिमचे सदस्य आले. त्यांनी व गावातील युवकांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर लहान उसाच्या सरीत मगरीला पकडून बंदिस्त केले. मगर वनविभागाचे नरंदे वनपाल साताप्पा जाधव, वनरक्षक राहुल जोनवाल, प्रदीप सुतार, मदन बांगे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी ही मगर बंदिवासात सोडणार असल्याचे सांगितले. मगर अंडी घालण्यासाठी नदीपात्रातून बाहेर आले असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.
   

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crocodile nine feet long in kolhapur khochi