esakal | हाताशी आलेले पीक बघता बघता होते फस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Damage From Elephants In Here And Gadwale Kolhapur Marathi News

पूर्वी सायंकाळ झाली की, शेतकरी हातात कंदील, रात्रीच्या जेवणाचा डबा आणि सोबतीला कुत्रे घेऊन शेत गाठत असत. मचाणावर बसून हाकाऱ्या द्यायच्या, पत्र्याचे डबे वाजवून जंगली प्राण्यांना घाबरवून सोडायचे.

हाताशी आलेले पीक बघता बघता होते फस्त

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : पूर्वी सायंकाळ झाली की, शेतकरी हातात कंदील, रात्रीच्या जेवणाचा डबा आणि सोबतीला कुत्रे घेऊन शेत गाठत असत. मचाणावर बसून हाकाऱ्या द्यायच्या, पत्र्याचे डबे वाजवून जंगली प्राण्यांना घाबरवून सोडायचे. त्यातूनही एखादा प्राणी किंवा कळप आलाच, तर कुत्रे भुंकू लागले की, फटाके वाजवायचे. रानडुक्कर आणि गवे भिऊन पळून जायचे; परंतु गेल्या दोन दशकांपासून हत्तीचे आगमन झाले आणि रात्रीची रखवाल करणे बंद झाली. ऐन सुगीच्या तोंडावर पिकावर नांगर फिरवून जाणाऱ्या हत्तींच्या कळपाची इतकी दहशत आहे की, पीक घरात येईपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल थांबत नाही. 

गुडवळे येथे काल रात्री संतोष पाटील व त्यांच्या शेजारच्या शेतात हत्तींनी भातात धुडगूस घातलेला. मोठ्या प्रमाणात भाताचे नुकसान केलेले. संतोष पाटील आणि इतर शेतकरी हताशपणे शेताकडे पाहत होते. यावर्षी भात पिकासाठी पाऊसमान चांगले झाल्याने पीक अगदी जोमात होते. अवघ्या काही दिवसांतच भाताची रास घरात येणार होती; परंतु तत्पूर्वी हत्तींनी त्याचा फडशा पाडला होता. वाघोत्रेचे माजी सरपंच मारुती गावडे यांचे शेतातील घर. गेल्या महिन्यात दोन वेळा हत्तींनी त्यांच्या ऊस पिकावर ताव मारलेला. गावडे यांच्या घरानजीकच्या गोबर गॅसजवळून गेलेल्या हत्तींच्या पायाचे ठसे आजही स्पष्टपणे दिसत होते. उसात घातलेला धुडगूस आजही ताजाच वाटत होता. 

गावडे म्हणाले, ""शेतकऱ्याला राजा म्हणतात आणि हत्तीसारखा प्राणी पाळणे केवळ राजालाच शक्‍य आहे. आम्ही राजे आहोत. त्यामुळे नुकसान झाले म्हणून कुरकूर करायची नाही.'' अर्थात त्यांच्या या बोलण्यात उद्विग्नता होती. वन्यप्राण्यांकडून शेतीच्या नुकसान भरपाईबाबत शासन सकारात्मक नाही हेच त्यांना सांगायचे होते. हे असेच चालू राहिले तर शेतकरी जमिनी पड पाडतील. शेतीच पिकली नाही, तर खायचे काय असा प्रश्‍न निर्माण होईल हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. पार्ले येथील सदानंद सिताप उच्च शिक्षित शेतकरी. शेतात त्यांचे अनेक प्रयोग सुरू असतात. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. सुरवातीला या प्रयोगातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत होते. आजही मिळते; परंतु भीती एकच की, हत्ती पिकातून फिरले तर केलेला खर्च बुडणार. सायंकाळ झाली की, मन याच चिंतेने ग्रासते. 

चार कळप ठाण मांडून 
या विभागात चार हत्तींचा कळप ठाण मांडून आहे. कधी गुडवळेच्या बारीत, तर कधी पार्लेनजीक कुडे टेकावर त्यांचा मुक्काम असतो. ऊस, भात, नाचणा, मका यांसारखी बहुविध पिके आणि पाण्याचे साठे उपलब्ध असल्याने हत्ती आता या विभागातून जाणार नाहीत हे निश्‍चित. त्यांच्या अस्तित्वाबद्दल शेतकऱ्यांनाही सहानुभूती आहे; परंतु प्रश्‍न आहे तो नुकसान भरपाईचा. बाजारभावाप्रमाणे भरपाई मिळावी एवढीच शासनाकडे माफक अपेक्षा आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur