माझ्याकडे पैसे नाहीत चिकन उधार दे म्हणत गळ्यावार केला वार अन्

अमृत वेताळ
Tuesday, 12 January 2021

वार चुकविण्याच्या प्रयत्नात असताना चाकू कपाळावर बसल्याने गंभीर जखमी

बेळगाव  : चिकन उधारी देण्यास नकार दिल्याने दुकान चालकावर ग्राहकाने चाकू हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न केला. सोमवार (ता.11) सायंकाळी पाटील गल्ली खासबाग येथे ही घटना घडली असून सज्जद मेहबूब मकानदार (वय 32 पाटील गल्ली खासगाग) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी सचिन मोहन तुपारे (मुळ रा. होसूर बसवान गल्ली शहापूर सध्या रा. संभाजीरोड खासबाग) याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,
 फिर्यादी सज्जद यांचे पाटील गल्ली खासबाग येथे चिकन दुकान आहे. काल सायंकाळी 7.15 च्या सुमारास संशयित सचिन चिकन आनण्यासाठी त्याठिकाणी गेला होता. किलोचा चिकनचा दर किती आहे अशी विचारणा सचिनने केली. त्यावेळी सज्जद यानी किलोचा दर 160 रुपये असल्याचे सांगीतले. शहापूरात चिकनचा दर कमी आहे. तुझ्या दुकानात दर जास्त कसा अशी विचारणा सचिनने केली. आमच्या दुकानात इतका दर आहे पाहिजे तर घे नाहीतर दुसऱ्या दुकान जावून घे असे उत्तर फिर्यादी सज्जद यानी दिले. माझ्याकडे पैसे नाहीत चिकन उदारी देण्याची मागणी सचिनने करताच उदार देण्यास दुकानदाराने नकार दिला.

हेही वाचा- विमानात संकटकाळात धावला ‘देवदूत’-

 संशयिताने सज्जद यानी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत दुकानातील चाकू घेवून गळ्यावार वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकविण्याच्या प्रयत्नात असताना चाकू कपाळावर बसल्याने ते गंभीर जखमी झाले. दुसरा वार हनुवटीवर बसल्याने जखमीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारी आणि फिर्यादीच्या कुटुंबीयानी दुकानाकडे धाव घेत वाद सोडून घेतला. यापुढे सापडास तुला जीवानिशी सोडणार नाही अशी, धमकीही सचिनने दिली. त्यामुळे सज्जद यानी शहापूर पोलीसठाणे गाठून संशयिताविरोधात फिर्याद दाखल करुन घेतली. पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी गुन्हा दाखल करुन घेऊन तपास चालविला आहे.

संपादन- अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customer attack shop owner for refusing to lend chicken