
आजरा तालुक्यातील कोवाडे पंचक्रोशीमध्ये वनगाई व गव्याच्या कळपाने अक्षरक्षः धुमाकुळ घातला आहे.
भादवण : आजरा तालुक्यातील कोवाडे पंचक्रोशीमध्ये वनगाई व गव्याच्या कळपाने अक्षरक्षः धुमाकुळ घातला आहे. ते ऊस व मका पिकांचा फडशा पाडत आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण कसे करावे, या चिंतेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यात उन्हाळी पिक फस्त होत आहेत. वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
चित्रीचे मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने कोवाडे, निंगुडगे, पेद्रवाडी, हाजगोळी, सरोळी, दाभेवाडी येथील शेतकरी सुखावला आहे. पडिक असलेले क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शेतकरी उसाबरोबर मका, भुईमुग, तीळ, सुर्यफुल यासारखी विविध पिक घेत आहेत. पण या काही वर्षात या परिसरात वनगाई व गव्याच्या कळपांचा उपद्रव वाढला आहे.
रात्रीच्या वेळी हे कळप शेतात उतरून पिकांचा फडशा पाडत आहेत. शेतकऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी पारंपारिक बुजगावणेसह तारेचे कुंपन, डबे वाजवणे, कॅसेटचे रिळ, फटाके फोडणे यासह विविध उपाय योजनांचा अवलंब केला आहे, पण शेतकऱ्यांना गवे व वनगाई बधेनासे झाले आहेत.
निंगुडगे येथील विनायक विश्वास सावंत यांचे दोन एकरातील उसाची लावण फस्त केली आहे. त्याचबरोबर धनाजी यशवंत देसाई, तानाजी बाबुराव देसाई यांचेही उसाचे नुकसान केले आहे. कोवाडे येथील नागोजी गुंडू ऱ्होरटे, परशराम विठोबा होडगे, आप्पासो संतराम घोळसे यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे.
मलिग्रे, चाळोबा डोंगर परिसर व कोवाडे येथील लिलाव रांग नावाच्या डोंगरात गव्यांची राहूटी आहे. येथून ते सायंकाळच्या सुमाराला उतरतात व पिकांचा फडशा पाडतात. या कळपांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वनविभागाकडे करत आहेत.
रात्री जागू लागल्या....!
गवे व वनगाईंपासून पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीची राखण वाढवली आहे. शेतात माळे घालून शेतकरी पिकांचे संरक्षण करीत आहेत, पण तरीदेखील गवे व वनगाईंकडून पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरुच आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur