दुरूस्तीअभावी विद्युत जनित्रे धोकादायक स्थितीत

अजित माद्याळे
Saturday, 21 November 2020

कृषी वीज पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीकडून शेतवडीत विद्युत जनित्रे (डी.पी) बसविण्यात आली आहेत. अनेक वर्षापासूनची बहुतांशी जनित्रे देखभाल दुरूस्तीअभावी कार्यरत आहेत.

गडहिंग्लज : कृषी वीज पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीकडून शेतवडीत विद्युत जनित्रे (डी.पी) बसविण्यात आली आहेत. अनेक वर्षापासूनची बहुतांशी जनित्रे देखभाल दुरूस्तीअभावी कार्यरत आहेत. तात्पुरती दुरूस्ती केली जाते. परंतु या डी.पी.मधून शॉर्ट सर्कीट होवून आगीच्या घटना घडत आहेत. यात उसाचे नुकसान होण्याची भिती आहे. यामुळे महावितरण कंपनीने अशा डिपींचा सर्व्हे करून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

निलजी (ता. गडहिंग्लज) येथील शेतवडीतील एका डिपीमधून शॉर्ट सर्कीट होवून आगीची घटना घडली. सुदैवाने उसाची तोड झाल्यामुळे नुकसान टळले. उभे ऊस असताच तर मोठे नुकसान झाले असते. या डीपीवर क्षमतेपेक्षा अधिक विद्युत भार असल्याने वारंवार शॉर्ट सर्कीट होत असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी कंपनीने डी.पी.ची सुधारणा करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे शेतवडीतील अशा अनेक डी.पीं.विषयी आता भिती व्यक्त होत आहे. सर्वच नादुरूस्त आणि विद्युत भार अधिक असलेल्या जनित्रांच्या प्रश्‍नाने यानिमित्ताने डोके वर काढले आहे. 

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी बहुतांश शेतवडीत डी. पी. बसविले जातात. परंतु, अनेक डी.पी.वर अधिक विद्युत भार असल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी वारंवार या डीपी नादुरूस्त होत असल्याचेही निदर्शनास येते. वीज वाहिन्यांच्या घर्षणाने आणि शॉर्ट सर्कीटने यापूर्वी अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या अशा घटना घडल्यास कडक उन्हामुळे आग रौद्र रूप धारण करते. यामुळे त्याचे नियंत्रण करणे हाताबाहेर जाते.

सातत्याने होणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी कंपनीकडून प्रत्येक वर्षी सर्व्हेची गरज आहे. डी. पी. ची देखभाल दुरूस्ती करण्यासह त्रुटी दूर करण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येणे शक्‍य आहे. तसेच आगीमुळे होणारे कंपनीचेही नुकसान रोखता येते. डीपींची देखभाल करून नुकसान वाचवण्यासाठी महावितरण कंपनी हा प्रश्‍न मनावर घेणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
आमच्या ऊस क्षेत्राजवळच्या डीपीमधून शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. ऊस तोड झाल्यामुळे नुकसान टळले. अशा डीपींची सुधारणा करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणीही केली आहे. आगीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी डीपींची दुरूस्ती करण्याकडे कंपनीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 
- राकेश पाटील, मुत्नाळ 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger Of Electricity D P's Due To Lack Of Repairs Kolhapur Marathi News