
इटकरे (सांगली) : गावातील एखाद्याच्या मृत्यूची नोंद पहायची असेल तर ग्रामपंचायत गाठावी लागते. मात्र इटकरे त्याला अपवाद आहे. येथील एका अवलियाने मृत्यू नोंदीचा उपक्रम राबवला आहे. साधारण १५ वर्षापासून गावातील कोणाचाही मृत्यू झाला तर त्याची नोंद करण्यात त्यांनी सातत्य ठेवले आहे. सुमारे दोन हजार नोंदी त्यांच्याकडे नोंद आहेत. विजय श्रीपती पवार असं त्यांचं नाव.
बोलक्या स्वभावाने गावात सर्वपरिचित आणि आपलं वाटणारं असं हे व्यक्तीमत्व. कुणाच्याही मदतीला दिवस-रात्र न पाहता धावून जाणे हा स्थायीभाव. किराणा दुकान आणि मंडप व्यवसायानिमित्त त्यांचा ग्रामस्थांशी नेहमी व कायम संपर्क असतो. समाजाभिमुखतेमुळे त्यांना हा आगळावेगळा छंद जडला. हा उपक्रम केवळ छंद म्हणून सुरवात करुन न थांबता त्यांनी तो वाढवला. सलग १५ वर्षे सातत्य ठेवले आहे.
गावात कोणाचा मृत्यू झाला की त्यांचे काम सुरु होते. त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला, कोठे झाला, मृत्यूची तारीख, वेळ, मृत्यूसमयी संबंधीत व्यक्तीचे वय इतकेच नव्हे त्या दिवशी नक्षत्र कोणते होते हेही त्यांनी टीपायला सुरु केले. त्यासाठी वेगळे रजिस्टर तयार केले आहे. गावातील एखाद्या व्यक्तीचा परगावी मृत्यु झाला तरी संबंधीत कुटुंबाकडून माहिती घेऊन पवार रजिस्टर अपडेट करतात.
सरकारी कार्यालयातील रजिस्टरलाही मागे टाकेल असे त्यांचे हस्तलिखीत रजिस्टर आहे. त्यात गावातील व्यक्तींच्या मृत्युच्या नोंदी सुवाच्च अक्षरात नोंदवल्या आहेत. काही कारणास्तव मृत्यू नोंद हवी असल्यास ग्रामस्थ ग्रामपंचायतीची पायरी चढतात. मात्र तेथे अपेक्षित नोंद उपलब्ध नसेल तर डोळे झाकून विजय पवार यांच्याकडे त्यांची पावले वळतात. इथे आपल्याला अपेक्षित नोंद मिळेलच, अशी लोकांना खात्री असते. अनेकदा ग्रामपंचायतीचे कर्मचारीदेखील त्यांच्याकडे नोंद मिळवण्यासाठी येऊन जातात. ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसलेल्या नोंदीही त्यांच्या रजिस्टरमध्ये मिळून आल्या आहेत.
विरोध तरी सातत्य
अशुभ काम म्हणून अनेकदा कुटुंबीयांनी विरोध केला. अंधश्रद्धेतून काही ज्येष्ठांनी असले काम करू नकोस म्हणून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार यांनी विरोधाला दाद न देता समाजसेवेचे माध्यम म्हणून छंद जपला आहे.
"व्यक्तीच्या निधनानंतर संबंधीत कुटुंबिय दुःखात असतात. मृत्यु नोंदीकडे कोणी लक्ष देत नाही. अशिक्षीत कुटुंबात तर या बाबतीत अधिक बिकट अवस्था असते. मी तपशीलवार नोंदी ठेवायला सुरवात केली. हळूहळू छंद वाढत गेला. कालांतराने लोकांना नोंदींची गरज वाटल्यावर महत्व लक्षात आले. समाजसेवा, पुण्याईचं काम म्हणून विनामोबदला मी नोंदींची माहिती पुरवत असतो."
- विजय पवार, इटकरे
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.