मायक्रो फायनान्सकडील कर्ज माफीसाठी मोर्चा काढणार

अजित माद्याळे
Friday, 16 October 2020

मायक्रो फायनान्स कंपन्या खासगी सावकाराप्रमाणे महिलांना वसुलीसाठी तगादा लावून त्रास देत आहेत. कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने आर्थिक कुचंबणा वाढली आहे.

गडहिंग्लज : मायक्रो फायनान्स कंपन्या खासगी सावकाराप्रमाणे महिलांना वसुलीसाठी तगादा लावून त्रास देत आहेत. कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने आर्थिक कुचंबणा वाढली आहे. यामुळे महिलांची कर्जे शासनाने माफ करावीत, या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा आणि महागावात रास्ता रोको करण्याचा निर्णय कर्जदारांच्या मेळाव्यात घेतला. 

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे महाकाली मंदिरात महिला बचत गट, कर्जदार महिलांचा मेळावा झाला. जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक अध्यक्षस्थानी होते. बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, आजरा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष धीरज देसाई, महागाव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संजय रेडेकर, बापू कांबळे, ईश्‍वर कांबळे प्रमुख उपस्थित होते. 

नाईक म्हणाले, ""मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. फायनान्सच्या यंत्रणेकडून मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्जे दमदाटीने वसुली करून कंपन्यांचा फायदा करणे एवढाच उद्देश कंपनीचा असतो. कोरोना काळात आर्थिक नुकसानीला महिलांना सामोरे जावे लागले. सरकार उद्योगपती, भांडवलदारांची कर्जे माफ करते. त्याच पद्धतीने मायक्रो फायनान्सच्या जोखडातून महिला कुटुंबाची सुटका करावी.'' 

पाटील म्हणाले, ""मायक्रो फायनान्स म्हणजे एकप्रकारची सावकारीच आहे. जादा व्याजदराने कर्जे वसुली करून सामान्य महिलांचे हाल करीत आहेत. या कर्जाने महिला आर्थिक विळख्यात अडकलेत. ही कर्जे माफ होईपर्यंत संघटित लढाई करण्याची गरज आहे.'' देसाई, रेडेकर, ईश्‍वर कांबळे, मेघा पाटील, नूरजहॉं सय्यद, विद्या कांबळे यांची भाषणे झाली. रिजवाना खलिफा, शोभा भोगुलकर, सरोजनी वंटमुरी, पूजा चव्हाण, बापू कांबळे, रूपा कांबळे, वंदना कातकर, नंदा सुतार, कमल कांबळे, सविता नाईक, महादेव चव्हाण, संजय पाथरवट, दशरथ कांबळे आदी उपस्थित होते. सलमा सय्यद यांनी स्वागत केले. प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रंजना शिंदे यांनी आभार मानले. 

मेळाव्यातील ठराव 
- मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली थांबवावी 
- कंपन्यांकडून घेतलेली कर्जे माफ करावीत 
- शासन योजनेतून महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्जे मिळावी 
- कर्जदार महिलांनी कर्जे भरू नयेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision Of Agitation Against Micro Finance Kolhapur Marathi News