आजरा कारखान्याबाबत लवकरच निर्णय

रणजित कालेकर
Wednesday, 7 October 2020

आजरा कारखान्याचे चक्र यंदा सुरू करण्याबाबत सर्वंकष पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे सोमवार (ता. 5) संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची भेट घेवून चर्चा केली आहे.

आजरा : आजरा कारखान्याचे चक्र यंदा सुरू करण्याबाबत सर्वंकष पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे सोमवार (ता. 5) संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची भेट घेवून चर्चा केली आहे. या वेळी मुश्रीफ यांनी सकारात्मक संकेत दिले असून कारखाना सहकारात चालावा यासाठी मार्ग काढला जाण्याची शक्‍यता असून लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा बॅंकेने थकीत कर्जासाठी आजरा कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना चालवण्यास देण्यासाठी बॅंकेने दोन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यंदा या कारखान्याची चिमणी पेटणार, की नाही याबाबत संभ्रम असला तरी दुसऱ्या बाजूला कारखाना सहकारात सुरू रहावा यासाठी संचालक, व्यवस्थापन व कामगारांच्या पातळीवर धडपड सुरू आहे.

जिल्हा बॅंकेने सकारात्मकता दर्शवली, तर थकहमी मिळवण्यासाठीचा मार्ग खुला होणार असल्याने त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपुर्वी कामगार संघाच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेवून या प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व संचालक मुकुंदराव देसाई, वसंतराव धुरे, सुधीर देसाई, एम. के. देसाई, अनिल फडके यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याशी भेट घेवून चर्चा केली आहे. यंदा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी त्यांना विनंती केली. अध्यक्ष मुश्रीफ यांनी कर्जाच्या पुर्नगठणाच्याबाबतीच्या काही तांत्रिक अडचणी असून त्या दूर करण्यासाठी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही दिली. 

संपादन - सचिन चराटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision On Ajara Sugar Factory Soon Kolhapur Marathi News