बांबूकाठी कॉमन फॅसिलिटी सेंटरची मागणी

रणजित कालेकर
Saturday, 24 October 2020

आजरा तालुक्‍यात बांबू (मेसकाठी) प्रमाण जास्त आहे. याची विक्री स्थानिक बाजारपेठेसह सांगली व अन्य जिल्ह्यात होते. बांबूवर प्रक्रियासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे.

आजरा : आजरा तालुक्‍यात बांबू (मेसकाठी) प्रमाण जास्त आहे. याची विक्री स्थानिक बाजारपेठेसह सांगली व अन्य जिल्ह्यात होते. बांबूवर प्रक्रियासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. भोर तालुक्‍यात वनविभागातर्फे बांबूवर "कॉमन फॅसिलेटी सेंटर' सुरू केले आहे. याच धर्तीवर तालुक्‍यात सेंटर उभारण्याची गरज आहे. यातून रोजगार निर्मिती होईल, याची पुर्तता व्हावी, अशी मागणी करत याबाबतचा ठराव सभापती उदयराज पवार यांनी पंचायत समितीच्या सभेत मांडला. 

सभेत हत्ती संगोपन केंद्रासह रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, कृषी यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. सभापती पवार अध्यक्षस्थानी होते. सदस्य शिरीष देसाई यांनी पंचायत समितीतर्फे केंद्रीयमंत्री रामविलास पासवान व कोविड योध्दा संदीप येसणे यांना आदरांजली वाहिली. उपसभापती वर्षा बागडी यांनी उत्तरप्रदेशमध्ये मुलीवर अत्याचार केलेल्यांवर कडक कारवाईची मागणी करत तेथील सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला. 

हत्ती संगोपन केंद्राबाबत स्थानिकांना वनविभागाने स्पष्टता देण्याची गरज होती. या केंद्राबाबत त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवे होते. त्याबाबत वनविभागाकडून आश्‍वासक पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे या केंद्राला विरोध होत आहे. घाटकरवाडी ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन हत्ती संगोपन केंद्राचा प्रश्‍न मार्गी लावा, अशी सूचना सभापती पवार यांनी केली. 

आजरा तालुक्‍यात 42 गावांना जंगलातील झऱ्यातून सायपन पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. बऱ्याचदा नळ पाणीपुरवठा योजना व झरे दुरुस्ती करण्यासाठी वनविभागाकडून अडचण केली जाते. याबाबतच्या परवानगीसाठी वरिष्ठांकडे जावे लागते. ही वेळखाऊपणाची प्रक्रिया असून स्थानिक पातळीवरील वनअधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार मिळावे, अशी मागणी सभेत पवार यांनी केली. याबाबतचा ठरावही घेण्यात आला. सदस्या रचना होलम, वर्षा कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे, विविध विभाग प्रमुख यांनी चर्चेत भाग घेतला. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी आभार मानले. 

"कॉमन फॅसिलेटी सेंटर'साठी ठराव 
आजरा तालुक्‍यात मेसकाठीचे प्रमाण जास्त आहे. याची विक्री स्थानिक बाजारपेठेसह सांगली व अन्य जिल्ह्यात होते. बांबूवर प्रक्रियासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. भोर तालुक्‍यात वनविभागातर्फे बांबूवर "कॉमन फॅसिलेटी सेंटर' सुरू केले आहे. याच धर्तीवर या तालुक्‍यात सेंटर उभारण्याची गरज आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. याबाबतचा ठराव सभापती पवार यांनी मांडला. 

ठेकेदाराचे बिल न काढण्याची मागणी 
पंचायत समितीच्या इमारतीचे व सभागृहाचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे. गेली अनेक दिवस याबाबत सभेत चर्चा होत आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराचे बिल काढू नये, अशी मागणी सदस्य बशीर खेडेकर यांनी केली. 

संपादन - सचिन चराटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand Common Facility Center For Bamboo Tree Kolhapur Marathi News