ब्रेकिंग : पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी  देवेंद्र फडणवीस आणि  चंद्रकात पाटील यांची चौकशी करण्याची यांनी केली मागणी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

धनगर विवेक जाग्रती अभियान संघटनेची विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार...

सांगली: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर धनगर- मराठा समाजात तयार झालेल्या तणावामागे मोठे राजकीय षढयंत्र आहे. या प्रकरणात भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा स्पष्ट सहभाग दिसतो आहे. त्यामुळे पडळकरांबरोबर या दोन्ही नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे केली आहे.

 तक्रारीत  ढोणे यांनी म्हटले आहे की,  पडळकर यांनी 24 जून रोजी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना 'शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे' असे वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे राज्यभरात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वक्तव्याच्या विरोधात आंदोलने झाली, हिंसक इशारे देण्यात आले. भावना दुखावतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भाषा सोशल मिडीयावर वापरण्यात आली. विशेषत: धनगर समाजाला उद्देशून चुकीच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. त्यामुळे सामाजिक अस्वस्थता वाढली. जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) व वाळेखिंडी (ता. जत, जि. सांगली) येथील तरूणांमध्ये शिवीगाळ झाली. राज्यभरात धनगर व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण झाले. त्यानंतर पडळकर यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली. 

हेही वाचा- हुबळीमध्ये क्वारंटाईन केलेला तरुण आला पळून अन् गावात उडला गोंधळ... -

संपुर्ण जग, देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक संकटाशी झुंजत असताना या वक्तव्यामुळे झालेला तणाव निश्चितच महाराष्ट्राला भुषणावह नाही. सर्व शासकीय यंत्रणा फिजीकल डिस्टन्सिंग राहावे म्हणून सर्वशक्ती पणाला लावत असताना दोन्ही बाजूच्या लोकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या पोलिस यंत्रणेवरही तणाव आला.  या सर्व प्रकरणाला पडळकर यांचे वक्तृत्व कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अपेक्षित आहे. 

हेही वाचा-होय...! डॉक्‍टर जिंकतील अन् कोरोना हरेल

वाचा सविस्तर...

पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस- चंद्रकांत पाटील या प्रमुख नेत्यांनी त्यांचे समर्थन करणारी वक्तव्ये केली आहेत. पडळकरांनी फडणवीसांकडे भावनेच्या भरात बोलल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे हा विषय संपला आहे, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले आहे. वस्तुत: पडळकरांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त केलेली नसताना चंद्रकांत पाटील हा विषय संपला, असे एकतर्फी जाहीर करतात. याचा अर्थ या संपुर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग आहे.  पडळकरांनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर झालेली आंदोलने यात देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा सहभाग स्पष्ट दिसतो आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याचे षढयंत्र या पाठीमागे दिसत आहे. कोरोनाचे महायभंकर संकट असताना हा महाराष्ट्रद्रोही प्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याने वेसन घालणे आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for Leaders should be questioned Chief Minister Devendra Fadnavis and BJP state president MLA Chandrakant Patil