
कोल्हापूर ः जिल्ह्यात महिन्याला सरासरी तीन ते साडेतीन हजार वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती. कोरोना काळात ती सुमारे पंधरा हजारांपर्यंत पोचली. जिल्ह्यातील सर्व उत्पादकांकडून रोज सुमारे अडीच ते तीन हजार सिलिंडर ऑक्सिजन तयार होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यात यापुढे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. एकही रुग्ण ऑक्सिजन मिळत नाही म्हणून मृत होणार नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना भीतीचे काहीच कारण नाही, असे चित्र आहे.
कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात रोज नव्याने पाचशे-सहाशे रुग्ण पॉझिटिव्ह होत आहेत. काहींची प्रकृती गंभीर होत आहे. काहींना धाप लागत आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. परिणामी जिल्ह्यात ऑक्सिजनची सुमारे पाच पट मागणी वाढली आहे, तर सीपीआरमध्ये सुमारे दहा पटीने मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवेल, अशी स्थिती होती; मात्र सीपीआरमध्ये गॅस टाकी बसविल्यामुळे तेथील सिलिंडरची मागणी कमी होईल, असे वितरकांचे मत आहे. तसेच जिल्ह्यात पुरेशा उत्पादन क्षमतेमुळे पुण्यासह इतर ठिकाणांहूनसुद्धा ऑक्सिजन मागवावा लागणार नाही, असाही ठाम विश्वास वितरकांचा आहे.
कोरोना महामारीपूर्वी सीपीआरमध्ये महिन्याला हजार-बाराशे सिलिंडरची मागणी होती. कोरोनाच्या काळात सुमारे दहा हजारांपर्यंत पोचली होती. तेथे सुमारे दहा पट मागणी वाढली. मागणीत अशी वाढ होण्याची पहिलीच वेळ असल्याचे वितरकांकडून सांगण्यात येते. तसेच सध्या सीपीआरमध्ये ऑक्सिजनसाठी टाकी बसविल्यामुळे तेथील सिलिंडरची मागणी कमी होईल. तो पुरवठा इतर ठिकाणी करता येणार आहे.
ऑक्सिजनची गरज
साधारण एका सिलिंडरमध्ये सात क्यूबिक मीटर ऑक्सिजन असतो. म्हणजे साधारण एका सिलिंडरमध्ये सात किलो ऑक्सिजन असतो. एका व्यक्तीस 24 तासांत किती सिलिंडर आवश्यक आहे हे त्या रुग्णांवर अवलंबून असते. नेहमी आयसीयूमध्ये मिनिटाला चार ते आठ लिटर ऑक्सिजन दिला जातो; मात्र कोरोना रुग्णाला त्याची सुमारे 40 ते 80 लिटर आवश्यकता असते. त्यामुळे आणि रुग्णांचीही संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे.
साधारण एका मोठ्या (सात केजी) सिलिंडरची विक्री सुमारे अडीचशे रुपयांना केली जाते. लहान सिलिंडर दीडशे रुपयांना दिला जातो. डॉक्टरांकडून गरजेनुसार ऑक्सिजनच्या सिलिंडरची मागणी होते. जिल्ह्यात कोल्हापूर ऑक्सिजन, महालक्ष्मी आणि के. नायट्रोजन कंपन्यांकडून वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. जिल्ह्यात सरासरी तीन हजार, तर कोरोना काळात सुमारे पंधरा हजारांपर्यंत गरज पोचली. तरीही उत्पादकांकडून जिल्ह्याला लागेल इतका साठा उपलब्ध होऊ शकतो. सद्यःस्थितीला तरी ऑक्सिजन कमी पडणार नाही.
मोतीराम ऊर्फ प्रकाश मिशाळ ः शिवम मेडिकल ऑक्सिजन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.