आता काळजी घ्यायला हवी...

Dengue and malaria are rampant in the city
Dengue and malaria are rampant in the city

कोल्हापूर : शहरातील अनेक प्रभागांमध्ये डेंगीच्या साथीचा शिरकाव झाला असून, गेल्या पंधरा दिवसांत डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाशी लढाई सुरू असतानाच आता डेंगी, मलेरियाचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शहरातील दाट वस्ती आणि झोपडपट्टी विभाग हे डेंगीच्या प्रादुर्भावाची प्रमुख ठिकाणे आहेत. शहरातील दाट वस्ती, झोपडपट्ट्या, उपनगरे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता काळजी घ्यायला हवी. तर नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. डास प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देण्याची आवश्‍यकता आहे. 

कोल्हापूर शहरात दरवर्षी डेंगीची साथ उद्‌भवते. यामुळे अनेकांचा जीव गेल्याचीही उदाहरणे आहेत. विशेषतः लहान मुलांना याचा अधिक धोका आहे. यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विरुद्धची लढाई सुरू आहे. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन सुमारे दोन महिने तरी ठप्प होते. आता कुठे जनजीवन सुरळीत होण्यास हळूहळू मदत होत आहे. पावसाळ्यालाही आता सुरुवात झाली आहे; पण शहरात आता डेंगीच्या साथीने प्रादुर्भाव वाढत चालला आहे. विशेषतः झोपडपट्टी आणि दाट वस्तीची ठिकाणे येथे डेंगीने जोर धरला आहे. शहर, उपनगरे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातूनही या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. 

काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या उचगाव येथेही डेंगीने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या परिसरातही डेंगीचे रुग्ण आढळून येत असल्याच्या तक्रारी आहेत. 
शहरातील जरगनगर रोडवरील म्हाडा कॉलनी येथे रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. उपचार करण्यासाठी रुग्ण सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात जात असल्याने महापालिकेकडे त्यांची आकडेवारी नाही; पण शहरातील अनेक खासगी डॉक्‍टरांनी मात्र शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक रक्तचाचणी प्रयोगशाळेमध्येही रक्त तपासणीसाठी लोक येत असून, येणाऱ्या तपासण्यांमध्ये डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. डेंगी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही महापालिकेने आता ठोस उपाययोजना करायला हव्यात. 

मोहिमांमध्ये सातत्य नव्हते 
अनेक दाट वस्ती किंवा झोपडपट्टीमध्ये घरावर टायरी, बॅरेल, रिकामे कॅन, नारळाच्या करवंट्या पडल्याचे दिसून येते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोहीम राबवून डेंगीचे डास उत्पत्तीस निमंत्रण देणारे घटक नष्ट करण्याचा प्रयत्न महापालिका करत असते. यंदा कोरोनामुळे अशाप्रकारच्या मोहिमांमध्ये सातत्य नव्हते. त्यामुळे रुग्ण वाढत असावेत, असा संशय आहे. 

डेंगीबाबत काळजी घ्या... 
डेंगीचे डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात. त्यामुळे आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस साजरा करण्याची गरज आहे. पाणी साठवण करणारी भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडी करावीत. स्लॅबवरील पाण्याच्या टाक्‍यांना झाकणे बसवावेत. तसेच डास उत्पत्ती केंद्रे नष्ट करावीत. घराजवळची पाण्याची डबकी नष्ट करावीत. 

परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना सर्वेक्षणासोबत डेंगीबाबतही सर्वेक्षण केले जाते. उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय दोन्हींबाबत जनजागृती सुरू आहे. ज्यांच्या घरी फ्रीज अथवा ए.सी. आहे, त्यांनी त्यामध्ये साचलेल्या पाण्यात डास असतील तर ते पाणी फेकून द्यावे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. परिस्थिती गतवर्षीपेक्षा चांगली आहे. औषध फवारणी आणि डास प्रतिबंधात्मक फवारण्याही सुरू आहेत. 
- डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका. 

दृष्टिक्षेप 
- पंधरा दिवसांत डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ 
- दाट वस्ती, झोपडपट्ट्या, उपनगरे, ग्रामीण भागात प्रादुर्भाव 
- डास प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देण्याची गरज 
- खासगी रूग्णालयात नागरिक जात असल्याने आकडेवारीत अडथळा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com