सलाम त्यांच्या जिद्दीला! ब्रेन हॅमरेज होऊनही झाले नायब तहसीलदार...

Despite brain haemorrhage he became Deputy Tahsildar kolhapur
Despite brain haemorrhage he became Deputy Tahsildar kolhapur

कोल्हापूर : राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होताना संघर्षाचा इतिहास आज ठळक झाला. ब्रेन हॅमरेज होऊनही बामणे (ता. भुदरगड) येथील सुनील लोंढे यांनी नायब तहसीलदार होऊन स्पर्धा परीक्षा अभ्यासकांसमोर आदर्श ठेवला. प्रतिकूल परिस्थिती भेदत लक्ष्मण कसेकर उपजिल्हाधिकारी झाले. शेतकऱ्याच्या मुला-मुलींनी मातीशी इमान राखत गगनभरारी घेतली. 

शेतकऱ्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी...
गडहिंग्लज ः खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी कुटुंबातील अनुप सध्या परभणी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संजय घोडावत कॉलेजमधून मेकॅनिकल पदवी त्यांनी मिळविली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यांनी पुणे येथे केला. त्यांची २०१८ च्या परीक्षेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्णी लागली. सध्या ते परभणी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. सेवेत असतानाच त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यात त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. माजी सरपंच व महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांचे ते चिरंजीव आहेत.


पेठवडगावचा सुपुत्र उपजिल्हाधिकारी...
पेठवडगाव ः येथील विजय यांनी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील असिस्टंट कमांडंट परीक्षेत यश मिळवले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बळवंतराव यादव हायस्कूल, तर माध्यमिक शिक्षण वडगाव विद्यालयातून झाले. एम.आय.टी.तून ते बी.ई. मेकॅनिकल झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुणे, दिल्ली येथे चार वर्षे अभ्यास केला. इंजिनिअर झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यू न देता स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले आणि त्यात यशही मिळवले.

प्रतिकूल स्थितीत भेदली ‘लक्ष्मण’ रेषा...
आजरा देवर्डे (ता. आजरा) येथील लक्ष्मण यांनी प्रतिकूल स्थितीत यश मिळविले. सध्या ते सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय) येथे कार्यरत आहेत. त्यांची गतवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परीक्षेत सहायक वनसंरक्षकपदी निवड झाली होती. त्या वेळी त्यांनी खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. राज्यात खुल्या वर्गातून आता त्यांनी २० वी रॅंक मिळवली. त्यांचा मोठा भाऊ राम कसेकर यांची गतवर्षी राज्य लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक अधिकारीपदी निवड झाली आहे. भाऊ राम व प्राथमिक शिक्षक पांडुरंग शिप्पूरकर यांचे त्यांना सहकार्य मिळाले. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे, असे त्यांनी सांगितले.

शियेचा विपुल पोलिस उपअधीक्षक...
नागाव ः शियेतील विपुल पाटील यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शिये हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून झाले. इंजिनिअरिंग प्रिंटिंग अँड पॅकेजिंगमधून डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी २०१५ला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरवात केली. त्यांनी २०१८ला अंतिम परीक्षा दिली होती. मात्र, चौथ्या प्रयत्नात त्यांना यश आले. त्यांचे वडील विजय पाटील यांचा १९९८ला अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांच्या शिक्षणात कोणतीच कसूर केली नाही. विपुल यांनी पाच वर्षे पुण्यात राहून अभ्यास केला.


पाडळी खुर्दचा संदीप पोलिस उपअधीक्षक
कोल्हापूर ः शेतकरी कुटुंबातील संदीप यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाडळी खुर्द येथे झाले. डी. सी. नरके महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. न्यू पॉलिटेक्‍निकनंतर त्यांनी केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी. ई. मेकॅनिकची पदवी मिळविली. सध्या ते राज्य कर निरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.


शेतकऱ्याची मुलगी तहसीलदार...
आजरा ः चिमणे (ता. आजरा) येथील कौशल्याराणी मध्यवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहेत. शालेय जीवनापासून त्यांना अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याच उमेदीने स्पर्धा परीक्षेचा सराव करत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. यापूर्वी त्यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती. तीन महिन्यांपूर्वी त्यांना ठाणे जिल्हा आदिवासी विभाग उपआयुक्तालयाकडे प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. त्यांनी राज्यसेवेची परीक्षा दिली होती.

हनिमनाळचे प्रवीण उपअधीक्षक...
गडहिंग्लज ः हनिमनाळच्या प्रवीणकुमार यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर हनिमनाळ, तर माध्यमिक गडहिंग्लजच्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमधून झाले. दहावीला त्यांनी ८१ टक्के गुण मिळविल्यानंतर एम. आर. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. पुढे जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केल्यावर ते पहिल्याच प्रयत्नात राज्य कर निरीक्षक झाले. राज्यसेवेसाठी त्यांनी दोन वेळा प्रयत्न केले. तिसऱ्या प्रयत्नात ते राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक झाले. सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तास नियोजनपूर्वक अभ्यासातून यश मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले.


शेतकऱ्याची मुलगी औद्योगिक अधिकारी
कोल्हापूर ः मानसी यांचे शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमधून झाले. त्यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधून अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर २०१६-१७ला अभ्यासाला सुरवात केली. तिसऱ्याप्रयत्नात त्यांना यश आले. आरएफओ म्हणून त्यांचे सिलेक्‍शन झाले असतानाही त्या पदावर रुजू झाल्या नाहीत. त्या शेतकरी कुटुंबातील आहेत.


रोहिणी पाटील यांचे लख्ख यश
सरूड ः सौ. रोहिणी किरण पाटील यांचे ब्राह्मणी (जि. नगर) हे माहेरगाव असून त्यांनी उत्तराखंड येथून ‘एम टेक’ (आयआयटी) हे उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. २०१५ त्यांची राज्यसेवा परीक्षेतून सहायक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये पुणे व गोंदिया जिल्ह्यात सेवा बजावली आहे. २०१९ मध्ये त्यांनी मंत्रालय कक्षाधिकारी म्हणून यश संपादन केल्यानंतर सध्या त्या पुणे येथे प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत रुजू आहेत.


अनिल पाटील यांची अखेर यशाला गवसणी
सरूड ः नायब तहसीलदारपदी निवड झालेले अनिल बाबूराव पाटील यांनी बीएएमएस हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून, त्यांनी सामान्य शेतकरी कुटुंबातून शैक्षणिक वाटचाल करताना चिकाटीने जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले. आई, वडील व भाऊ हे त्यांच्या परिवारातील सदस्य सामान्य शेतकरी आहेत. त्यांना अनेकदा यशाने हुलकावणी दिली होती. अखेर जिद्दीवर मात केली.


ब्रेन हॅमरेज होऊनही नायब तहसीलदार...
सुनील लोंढे यांनी बामणेतील विद्यामंदिरमधून प्राथमिक, तर पिंपळगाव हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते गारगोटीतील के. एच. कॉलेजमधून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाले. कमलादेवी गौरीदत्त पुनर्वसू आयुर्वेदिक महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. झाले. प्रॅक्‍टिस सुरवात करताना त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. मुंबईत त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. हाफ व्हिजन झाल्याने डॉक्‍टर पेशा करू शकणार नाहीत, याची जाणीव झाली. धाकडा भाऊ अनिल याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दु:ख बाजूला ठेवून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे निश्‍चित केले. स्टडी सर्कल व युनिक ॲकॅडमीमधून लेक्‍चरर म्हणून कामास सुरवात केली. अभ्यासासाठी पत्नी पल्लवी यांचे सहकार्य मिळाले. सातत्यपूर्ण अभ्यासातून त्यांना यशाला गवसणी घालता आली. त्यांची बहीण सुनीता लॅब टेक्‍निशियन आहेत. ते म्हणाले, ‘‘माझे वडील इंडियन आर्मीत होते. ते सेवानिवृत्त झाले असून, शेती करतात. त्यांचे संघर्षमय आयुष्य मी पाहिले आहे. तेच माझी प्रेरणा होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com