गडहिंग्लजमध्ये वाढीव हद्दीचा विकास आराखडा लवकरच

अजित माद्याळे
Thursday, 25 February 2021

हद्दवाढीनंतर गडहिंग्लज नगरपालिकेला जोडलेल्या वाढीव हद्दीची विकास आराखडा (डी. पी.) तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गडहिंग्लज : हद्दवाढीनंतर गडहिंग्लज नगरपालिकेला जोडलेल्या वाढीव हद्दीची विकास आराखडा (डी. पी.) तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी "जीआयएस' (भौगोलिक माहिती प्रणाली) चा वापर होणार असून ही योजना तयार करण्यासाठी पालिकेने तत्काळ ठराव सादर करावा, अशी सूचना कोल्हापूर नगररचनाच्या सहायक संचालकांनी केली आहे. या विकास योजनेमुळे वाढीव हद्दीचा नियोजनबद्ध व सुसंगत विकास होण्यास मदत होणार आहे. 

दीड वर्षापूर्वी पालिकेची हद्दवाढ झाली. बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चोहोबाजूंनी असणाऱ्या वसाहती पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्या आहेत. वाढीव हद्दीचा यापुढचा विकास हा नव्याने तयार होणाऱ्या विकास योजनेतील मार्गदर्शक तत्वानुसार होणार आहे.

पुढील काही वर्षात वाढणाऱ्या संभाव्य लोकसंख्येचा विचार होवून त्यादृष्टीने आरक्षणे टाकली जातात. यामध्ये रहिवास, वाणिज्य, औद्योगिक असे विभाग पाडून रस्ते, खुल्या जागा, लोकांना आवश्‍यक असलेल्या विविध प्रयोजनांसाठीच्या आरक्षणांचा समावेश असणार आहे. यामुळे वाढीव हद्दीच्या विकासाला गती येणार आहे.

पालिका नगररचना विभागाचे नगररचनाकार अभियंता श्रीकांत गिते यांनी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाने सहायक संचालकांकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करीत आहेत. 

या योजनेसाठी जीआयएस प्रणालीचा वापर होणार आहे. योजनेसाठी सहायक संचालकांची नियुक्ती केली असून त्यांच्यासह मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या समावेशाची समिती होईल. या समितीकडून योजनेची कार्यवाही होणार आहे.

जीआयएस प्रणालीमुळे योजनेच्या तयारीसाठी कमी कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर अथवा तांत्रिक अडचण आली नाही तर अडीच वर्षात योजना तयार होईल. पुण्यातील नगररचना संचालकांच्या अखत्यारीत योजनेसाठी खासगी संस्थेची नियुक्ती होणार असून त्यासाठी ठरावाची आवश्‍यकता आहे. योजनेसाठीचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. 

500 हेक्‍टरमध्ये योजना 
वाढीव हद्दीचे क्षेत्र अंदाजे 500 हेक्‍टरपर्यंत आहे. या सर्वांची मोजणी होवून विकास योजना तयार होईल. हद्दवाढ क्षेत्रात 2011 च्या जनगणनेनुसार 5437 लोकसंख्या आहे. अंतिम योजना आकाराला येण्यासाठी दोन ते अडीच वर्षे लागणार आहेत. 

कोट 
हद्दवाढ विकास योजनेसाठीचा ठराव येणाऱ्या सभेत मंजूर करुन घेवू. कोणावरही अन्याय न करता नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने नियोजनबद्ध विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करू. 
- स्वाती कोरी, नगराध्यक्षा 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development Plan For Increased Boundary In Gadhinglaj Soon Kolhapur Marathi News