जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सव काळातही भाविकांना बंदी 

निवास मोटे 
Thursday, 15 October 2020

 डोंगरावर येण्या जाण्याच्या सर्व मार्गावर पूर्णपणे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात येणार आहे

जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सव काळातही भाविकांना डोंगरावर येण्यास प्रशासनाने बंदी घातली असून भाविकांनी नवरात्र उत्सव काळात डोंगरावर येऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा अजून प्रार्दूभाव असून डोंगरावर भावीक येण्यामुळे  कोरोनाचा प्रभाव वाढू नये व कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी प्रशासन हा निर्णय घेतला आहे.

 डोंगरावर येण्या जाण्याच्या सर्व मार्गावर पूर्णपणे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात येणार आहे. याबाबतची बैठक डोंगरावर झाली. यावेळी पन्हाळा शाहु वाडीचे  प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थानचे अधिक्षक महादेव दिंडे, दहा गावकरी प्रतिनिधी, ग्रामस्थ पुजारी यावेळी उपस्थित होते. सर्व ग्रामस्थ पूजारी यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

डोंगरावर गेल्या आठवडयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, ग्रुप ग्रामपंचायत, गावकरी प्रतिनिधी यांच्यात मंदिर बंद असल्यामुळे दर्शन एलईडीव्दारे दर्शन देण्याबाबत चर्चा सुरु होती. पण येणाऱ्या भाविकांचा विचार करून हा निर्णय ही मागे घेण्यात आला. पुजारी वर्गाने आपल्या भक्तांना नवरात्र उत्सव काळात डोंगरावर दर्शनासाठी बोलवू नये अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

हे पण वाचामराठा आरक्षणासाठी लाल महाल ते लाल किल्ला आंदोलन छेडणार ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

दरम्यान, करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी देवीस नवरात्र उत्सव काळात दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. सर्रास हेच भाविक जोतिबावर दर्शनासाठी येतात. ही सद्य स्थिती आहे.

 जोतिबा डोंगरावर यंदा चैत्र यात्रा,  श्रावण षष्ठी यात्रा, नगरप्रदक्षिणा झाली नाही. तसेच आता प्रशासनाने नवरात्र उत्सव काळातही भाविकांना येण्यास बंदी घातल्यामुळे  व्यापारी दुकानदार ग्रामस्थ यांना झळ सहन करावी लागणार आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees banned during Navratra festival on Jotiba hill