इंचनाळची वेगळी वाट, 39 वर्षे... एकच टोळी, एकच वाहनमालक 

अवधूत पाटील
Friday, 4 December 2020

ऊसतोडणी हंगाम सुरू झाला की गावागावांत एकच चर्चा असते ती म्हणजे ऊसतोडणी टोळींची. कुणाची टोळी आली, कुणाच्या टोळीने दगाफटका केला, कोणत्या वाहनमालकाला किती लाखांना फसविले वगैरे वगैरे..! यंदा तर वाहनमालकांकडून पैसे घेऊनही टोळ्या न येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

गडहिंग्लज : ऊसतोडणी हंगाम सुरू झाला की गावागावांत एकच चर्चा असते ती म्हणजे ऊसतोडणी टोळींची. कुणाची टोळी आली, कुणाच्या टोळीने दगाफटका केला, कोणत्या वाहनमालकाला किती लाखांना फसविले वगैरे वगैरे..! यंदा तर वाहनमालकांकडून पैसे घेऊनही टोळ्या न येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील प्रकाश पोवार या वाहनमालकाकडील टोळी तब्बल 39 वर्षे काम करीत आहे, हे विशेषच म्हणावे लागेल. सदरचे ऊसतोडणी मजूर स्थानिक असले तरी वाहनमालकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. 

शेतकऱ्याने पिकविलेला ऊस साखर कारखान्यांना पाठविण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो ऊसतोडणी टोळींचा. त्यांचे अर्थकारण मोठे असते. साखर कारखाने टोळींना थेट उचल न देता वाहनमालकांना देतात. त्यांच्याकडून मजुरांची टोळी तयार केली जाते. पण, यात धोका प्रचंड असतो. ऊसतोडणी टोळ्यांकडून वाहनमालकांना गंडा घालण्याचे प्रकार होतात. पैसे घेऊनही टोळ्या न येण्याचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकच आहे. 

मात्र, इंचनाळ येथील प्रकाश पोवार यांच्याकडील टोळी तब्बल 39 वर्षांपासून एकच आहे. 1982-83 मध्ये गावातील मजुरांची ही टोळी तयार झाली. आतापर्यंत मृत व काम झेपत नसल्याने फार तर चार-पाच जण बाजूला गेले आहेत. इतर सारे मात्र वर्षानुवर्षे एकत्र काम करीत आहेत. तेही एकाच वाहनमालकाकडे काम करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही बाब तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. परिसरातील विविध कारखान्यांना ऊसपुरवठा केला आहे. यंदा ही टोळी गडहिंग्लज साखर कारखान्याकडे आहे. गेल्या वर्षी याच टोळीने तब्बल दोन हजार 271 टन उसाचा पुरवठा केला होता. 

हे आहेत ऊसतोडणी मजूर... 
बबन पोवार (मुकादम), मारुती जाधव, परशराम सावंत, प्रकाश मोहिते, दयानंद जाधव, नारायण कांबळे, पांडुरंग कांबळे, रमेश इंगवले, संभाजी जाधव, बाळासाहेब पोवार, बबन पाटील, दिलीप पालकर, संजय पोवार, पांडुरंग कांबळे, गणपती भोसले, दत्तात्रय कुंभार, सुनील बाबर, दत्तात्रय नाईक, तानाजी भोसले, रमेश बारदेस्कर, नेताजी जाधव, सुभाष मोहिते, किरण भोसले. यातील चार जण नंतर सहभागी झाले आहेत. उर्वरित सारे गेल्या 39 वर्षांपासून एकत्र आहेत. 

बीड टोळीचा चार लाखांना गंडा... 
प्रकाश पोवार यांनी यंदा बीडची आणखी एक टोळी केली होती. पण, या टोळीने चार लाख रुपयांना गंडा घातला आहे. पैसे घेणारा मुकादमच पसार झाला आहे. एकीकडे तब्बल 39 वर्षे प्रामाणिकपणे राबणारी गावातील टोळी, तर दुसरीकडे बीडच्या टोळीचा असा अनुभवही त्यांना आला आहे. 

सगळे मिळून काम करीत आहोत
इतर टोळीत बोलावतात. पण, आम्ही पहिल्यापासून मालकाला सोडायला नाही. काम झेपत नाही म्हणून आतापर्यंत चार-पाच जण बंद झाले. पण, इतर टोळीत कोण गेला नाही. सगळे मिळून काम करीत आहोत. 
- बबन पोवार, मुकादम 

एकच टोळी असल्याने विसंबून राहता येते
घरची एक एकर शेती आहे. त्यातही 25 गुंठे बागायती. त्याशिवाय उत्पन्नाचे साधन म्हणजे ऊस वाहतूक. त्या जोरावरच मुलांचे शिक्षण पूर्ण केले. घर बांधले. दरवर्षी ठरलेली एकच टोळी असल्याने विसंबून राहता येते. 
- प्रकाश पोवार, वाहनमालक 

 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different Patterns Of Cane Harvesting Workers In Inches Kolhapur Marathi News