डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहणाऱ्या देशात गमवावा लागतो जीव

केरबा जाधव
Wednesday, 25 November 2020

म्हासुर्ली परिसरातील तीन धनगरवाड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर

धामोड (कोल्हापूर)  : स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलाडंली तरीही मूलभूत गरजांसाठी म्हासुर्ली  (ता. राधानगरी) परिसरातील तीन धनगरवाड्यांतील वाड्यावस्त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहात असलेल्या देशात रस्त्याअभावी जीव गमवावा लागत आहे. 

रस्त्यामुळे धनगरवाड्यांवरील भूमिपुत्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दाट जंगल आणि डोंगरात वसलेल्या रातंबीचा धनगरवाडा, मधला धनगरवाडा व पादुकाचा धनगरवाडा हे तीन धनगरवाडे आहेत. निसर्गावर अवलंबून बेभरवशाची शेती, उस तोडणी आणि गुऱ्हाळघरांवर काम करून उपजीविका करणारा येथील धनगर समाज आहे. अद्यापही विकासापासून दूर आहे. केवळ रस्ता नसल्याने येथे दरवर्षी किमान पाच ते सहा लोकांना 
उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. 
                
येथील ग्रामस्थ दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर पदरमोड करून जेसीबी यंत्रणेने रस्ता करतात, पण यावर्षी रस्ता केलेला नाही.  
हे धनगरवडे जंगलाला लागून असल्याने गव्यांचे हल्ले, सर्पदंश आणि प्रसूतीसाठी रुग्णांना मानेवाडीपर्यंत सुमारे पाच किलोमीटर यावे लागते किंवा बाजल्यावरून आणावे लागते. तिथून पुढे धामोड आरोग्यकेंद्रापर्यंत १५ किलोमीटर जावे लागते. त्यामुळे अनेक रुणांची हेळसांड होते, तर काहींची जीवनयात्रा वाटेतच संपते. अशीच हृदयद्रावक घटना भागूबाई राजू घुरके यांच्या वाट्याला आली. रात्री दोन वाजता प्रसववेदना सुरू झाल्यानंतर त्यांना बाजल्यावरून रुग्णालयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केल, पण वाटेतच प्रसूती होईल, या भीतीने तिला घराकडे नेले. 
अतिरक्तस्त्रावामुळे मातेला आणि नवजात बालकाला जीव गमवावा लागला. तीन महिन्यांपूर्वी सुनील गंगाराम घुरके या शाळकरी मुलाला सर्पदंशामुळे प्राण गमवावा लागला होता.
 

या वाड्यावरील धनगर समाजाने आणि  जिल्हा प्रशासनाकडे तत्कालीन लोकप्रतिनिधी व विद्यमान लोकप्रतीनिधींकडे रस्त्याची मागणी केली आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यापुढे आणखी किती वर्षे अशी उलटणार आणि आणखी किती बळी जाणार हाच प्रश्न आहे.
 - धोंडिराम मलगुंडे, रहिवासी.

पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी रस्त्याबाबत चर्चा झाली आहे. मार्चपर्यंत या सहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. गतवर्षी या रस्त्यासाठी सात लाखांचा निधी दिला होता. या रस्त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. 
- विनय पाटील, जिल्हा परिषद सदस्य

०४४८
म्हासुर्लीपैकी मधला धनगरवाडा येथील रस्ता. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digital india dream but village problem is higher