
कोल्हापूर : संचारबंदीने खेळाडूंच्या अंग मोडून सराव करण्याला लगाम बसला आहे. मैदान, कोचिंग सेंटर, आखाड्यांना कुलूप लागल्याने नवोदित खेळाडूंचे बेसिक पक्के करण्यावरही मर्यादा आली आहे. घरात बसल्याने पोटाचा आकार वाढेल, या चिंतेने खेळाडू अस्वस्थ आहेत. "खेलो इंडिया ई खेल पाठशाला' उपक्रमाने खेळाडूंच्या अंगातील रग शाबूत ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
खेळातील डावपेच झूम मीटिंगद्वारे खेळाडू अंगात मुरवत आहेत. क्रीडा पंढरी कोल्हापूरच नव्हे, तर देशभरातील खेळाडू डिजिटल दुनियेत शड्डू ठोकण्यासाठी सज्ज आहेत. 21 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना या उपक्रमाद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.
स्पोर्टस् ऍथोरिटी ऑफ इंडियाने (साई) राष्ट्रीय स्तरावरील खेळांच्या संघटनांना हाताशी घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. आठ ते बारा खेळाडूंचे बेसिक पक्के व्हावे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरावाप्रमाणे त्यांचा सराव घडावा, वॉर्मअपच्या नव्या पद्धती त्यांच्यात रुजाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमाचा नारळ एक जूनला फुटला असून, पहिल्या आठवड्यात उदयोन्मुख खेळाडूंना त्या-त्या खेळातील प्राथमिक माहिती दिली जात आहे.
दुसऱ्या आठवड्यात अर्थात आठ जूनपासून खेळात पारंगत असलेल्या खेळाडूंना डावपेचांची प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा उदयोन्मुख खेळाडूंना दिलेल्या डावपेचांची उजळणी घेतली जाईल. साईच्या सोनीपत येथील रिजनल सेंटरमधून झूम मीटिंगद्वारे हा उपक्रम राबवला जात आहे.
साई व रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पैलवानांसाठी हा उपक्रम सुरू आहे. देशभरातील 500 कुस्तीपटू उपक्रमात सहभागी होत आहेत. प्रशिक्षणाबरोबरच स्पोर्टस् सायकॉलॉजी व आहाराबाबत त्यांना माहिती दिली जाते. ऑलिंपिक प्रशिक्षक ओ. पी. यादव यांनी पहिल्या आठवड्यात पैलवानांना मार्गदर्शन केले.
- अमर निंबाळकर, एनआयएस प्रशिक्षक, दिल्ली.
ऍप डाऊनलोडसाठी
विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू व प्रशिक्षकांनी झूम मिटींग ऍप डाऊनलोड करावे. पैलवानांसाठी झूम ऍपवर मिटींग आयडी - 85352370674, तर पासवर्ड - 460721 आहे. याद्वारे कुस्तीतील प्रशिक्षणासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन अमर निंबाळकर यांनी केले आहे.
खेळ कोणताही असो, डावपेच शिकण्यासाठी वस्ताद, प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आखाडे बंद असल्याने पैलवानांचा सरावावरील जोर कमी होता. उदयोन्मुख पैलवानांना मार्गदर्शन कोण करणार? हाही प्रश्न होता. ई खेल पाठशाला उपक्रमाने तो निकालात निघालाय.
- कृष्णात पाटील, कुस्ती प्रशिक्षक, मोतीबाग तालीम.
क्रीडा प्रकार असे :
* धनुर्विद्या, * बॉक्सिंग, * सायकलिंग,* तलवारबाजी, *अथलेटिक्स,* फुटबॉल,* जिम्नॅस्टिक्स, * हॉकी, * ज्यूदो, *कयाकिंग व कैनोइंग, * कबड्डी, *पॅरा खेल, * रोइंग,* नेमबाजी,* तायक्वांदो, *टेबलटेनिस, * व्हॉलीबॉल, *वेटलिफ्टिंग,* कुस्ती, *वुशू
दृष्टिक्षेप
- स्पोर्टस् ऍथोरिटी ऑफ इंडियाचा (साई) उपक्रम
- खेळातील डावपेच झूम मीटिंगद्वारे
- "खेलो इंडिया ई खेल पाठशाला'तून मार्गदर्शन
- 21 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्रशिक्षण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.