स्वाभिमानीत "नाराजीनाट्य' ; शेट्टींची कोंडी; अंतर्गत मदभेद चव्हाट्यावर 

गणेश शिंदे 
Wednesday, 17 June 2020

शेट्टी यांनी आमदारकी आणि खासदारकीपर्यंत मजल मारली खरी पण शेतकऱ्यांचे सगळेच प्रश्‍न सुटले नाहीत. पूर्वीचे प्रश्‍न आजही तसेच आहेत. 

जयसिंगपूर : राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेचा प्रस्ताव माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्विकारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजीनाट्याला प्रारंभ झाला. सोशल मीडियावर शेट्टींच्या निर्णयावरुन अंतर्गत मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. ही बाब शेट्टींची कोंडी करणारी ठरत असून यानिमित्ताने स्वाभिमानीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शेट्टी यांच्या संभाव्य आमदारकीवरुन दुसऱ्या फळीतील इच्छुकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहेत. 

मुळातच ऊस दराच्या प्रश्‍नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली. शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटविणाऱ्या कार्यकर्त्यांचाच आज विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. प्राथमिक चर्चेत स्वत: शेट्टी यांनीच विधानपरिषदेची ऑफर स्विकारल्यानंतर राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला तोंड फुटले. श्री शेट्टी यांची राजकीय सुरुवातच माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांच्या सहकार्यातून झाली. 

शिरोळ विधानसभा निवडणुकीत मादनाईक यांनी दोन वेळा पराभव पचविला. तर संघटना सोडल्यानंतर उल्हास पाटील यांना आमदारकी मिळाली. शिरोळ संघटनेचा बालेकिल्ला असतानाही मादनाईक यांचा पराभव संघटनेला आत्मचिंतन करायला लावणारा होता. सातत्याने कारखानदारांविरोधात आंदोलने करत असताना सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याचे सांगत शेट्टी यांनी आमदारकी आणि खासदारकीपर्यंत मजल मारली खरी पण शेतकऱ्यांचे सगळेच प्रश्‍न सुटले नाहीत. पूर्वीचे प्रश्‍न आजही तसेच आहेत. 

सदाभाऊ खोत, उल्हास पाटील यांच्यानंतर संघटनेत आक्रमक नेतृत्व उरले नाही. ही धुरा माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या खांद्यावर आली. त्यांनीही संघटनेला राम राम केला. नंतर पुन्हा घरवापसी झाली. लोकसभा, विधानसभेला संघटना बॅकफूटवर आली. कारखानदारांबरोबर जुळलेले सूत हेदेखील यामागील एक कारण ठरले. ज्या कारखानदारांना जेरीस आणले त्यांचेच गोडवे गाणे कार्यकर्त्यांना रुचले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. 

मादनाईक यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचा विचार लोकसभेआधी झाला होता. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीच्या वाट्याला आल्यानंतर विधानपरिषदेची एक जागाही संघटनेला देण्याचा शब्द मिळाला होता. जागाही मिळाली. मात्र, यावरुन सध्या संघटनेतील वादळ अनेक समस्यांची चाहूल देणारे ठरण्याची शक्‍यता आहे. शेट्टी यांच्या निर्णयाने मात्र सध्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून शेट्टी स्वत: आमदारकी घेणार की अन्य कोणाचा विचार होणार याच्याही चर्चांना उधाण आले आहे. 

हे पण वाचा -  मुश्रीफांच्या माघारीमागे ‘हे’आहे गणित 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Displeasure in swabhimani shetkari sanghatana