पाण्यावरून आजऱ्यात प्रश्‍नांची सरबत्ती

रणजित कालेकर
Friday, 20 November 2020

दर बैठकीला नवीन परिपत्रक येत असेल, तर पाणी योजना मार्गी लागणार कशी? जनतेला पाणी कसे मिळणार असा सवाल पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई यांनी केला. बहिरेवाडी पाणी योजनेला विलंब होत असल्याबद्दल विचारणा करत त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

आजरा: दर बैठकीला नवीन परिपत्रक येत असेल, तर पाणी योजना मार्गी लागणार कशी? जनतेला पाणी कसे मिळणार असा सवाल पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई यांनी केला. बहिरेवाडी पाणी योजनेला विलंब होत असल्याबद्दल विचारणा करत त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. आज झालेल्या पंचायत समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. सभापती उदयराज पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

बहिरेवाडीचे हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे त्याचबरोबर पाकीस्थानच्या भ्याड हल्यात हुतात्मा झालेले जवान, तालुका संघाचे संचालक धोंडीराम परीट व आजरा कारखान्याचे माजी संचालक सदाशिव जाधव यांना आदरांजली वाहण्यात आली. बहिरेवाडीच्या पाणी योजनेला विलंब का होत अशी विचारणा देसाई यांनी केली. 31 वर्षांची नको 15 वर्षांचा नवीन आराखडा तयार करून पाठवा, असे वरिष्ठाकडून सांगण्यात आल्याने विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर देसाई म्हणाले, दर बैठकीला नवीन परिपत्रक येत असेल तर योजना पुर्ण कशा होणार. जनतेला पाणी वेळेत कसे मिळणार. सदस्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवू नका. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनेचे इस्टीमेंट मिळत नसेल तर सभेत आढावा घेवू नये. उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी म्हणाले, वीज बिल माफ किंवा कमी केले जाणार नाही. वसुली ही होणारच आहे. कारण महावितरणची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे हप्ते पाडून दिले जातील. पण वसुली केली जाईल. आजरा तालुक्‍यातील थकबाकी 4 कोटी 18 लाखावर पोहचली असल्याचे त्यांनी सांगीतले. संकेश्‍वर बांधा रस्त्याचा डीपीआर उपलब्ध नाही तो उपलब्ध करावा, अशी मागणी सभापती पवार यांनी केली.

देसाई म्हणाले, नियोजीत संकेश्‍वर बांधा या रस्त्याचे केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरण झाला आहे. दुरुस्ती करण, मुल्यांकन ठरण्याच्या अगोदर रस्ता हस्तांतर झालाच कसा असा सवाल केला. बांधकाम विभागाबाबत स्वतंत्र बैठक बोलवावी, अशी सुचना सभापती उदयराज पवार यांनी केली. आरोग्य, पाणी, कृषी यासह विविध विषयांवर या वेळी चर्चा झाली. सदस्या वर्षा कांबळे, रचना होलम या वेळी उपस्थित होत्या. उपसभापती वर्षा बागडी यांनी आभार मानले. सहाय्यक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. 

शिष्यवृत्तीत चौथा क्रमांक 
'जिल्ह्यात आजरा तालुक्‍याचा शिष्यवृत्ती परीक्षेत चौथा क्रमांक आला आहे. यापुर्वी तो तिसरा क्रमांक होता. शिक्षण विभागाच्या गुणवत्तेत वाढ होण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 23 नोंव्हेबरपासून शाळा सुरु होणार आहेत. 180 शिक्षक 89 शिक्षकेत्तकर कर्मचारी आरटीपीसीआर चाचणी करण्याचे नियोजन तातडीने करावे, असे या वेळी सांगण्यात आले. 

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute With Officer About Water Issue In Ajara Kolhapur Marathi News