
गृहिणी, महिला बचत गटांची लगबग
निपाणी : दिवाळीसाठी आता फक्त ५ दिवस शिल्लक राहिले असताना गृहिणी, महिला बचत गट व फराळ करणाऱ्या व्यावसायिकांची लगबग सुरू आहे. यंदा किराणा महागल्याने फराळाच्या किंमतीही सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फराळ बनवणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी किंमतीमध्ये पन्नास ते सत्तर रुपयांची तफावत दिसते.
सध्या रेडिमेड फराळ घेणाऱ्यांचीही संख्या वाढल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. जीएसटी, इंधन व गॅसच्या वाढत्या भावामुळे किराणा सामान महागले आहेत. त्यामुळे रेडिमेड फराळाचीसुद्धा किंमत वाढली आहे. परंतु काही पदार्थ घरी बनवायचे व काही रेडिमेड घेण्याकडे कल आहे. पण दिवाळीच्या खमंग, कुरकुरीत व स्वादिष्ट फराळाची निपाणीत वेगळीच परंपरा आहे. चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या, लाडू (रवा, बेसन, मोतीचूर, बुंदी) चकल्या, शंकरपाळे, अनारसे, चिरोटे, शेव अशा फराळाचा सुवास दरवळू लागला आहे.
शहरात लागले स्टॉल
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी शहरातील चौकाचौकासह मुख्य रस्त्यावर फराळाचे स्टॉल उभारले आहेत. त्यामुळे शहरात खमंग दिवाळी फराळाचा सुवास दरवळला आहे.
रोहन राऊत
'गतवर्षीपेक्षा यंदा खाद्यतेलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय स्वयंपाक गॅस व मजुरीही वाढली आहे. त्यामुळे सर्वच फराळांचे दर सर्वत्र वाढले असले तरी आपण सेवाभावी वृत्तीने गतवर्षीच्या दराप्रमाणेच फराळाची विक्री सुरू केली आहे.'
- रोहन राऊत,फराळ उत्पादक, साखरवाडी- निपाणी
फराळाचे प्रतिकिलोचे दर
चिवडा *१६०
चकली *१७०
करंजी *३५०
शंकरपाळी *१६०
पातळ पोहे चिवडा *
नाचणी लाडू*१६०
बेसन लाडू *१६०
रवा लाडू *१४०
बुंदी लाडू * १५०
डिंक लाडू *२४०
लडगी लाडू *२००
खाजा *१६०
सोनपापडी *१६०
अनारसे *३२०
म्हैसूर पाक*१६०
संपादन - अर्चना बनगे