esakal | ऐन दिवाळीत अंधार: कोरोना बंदोबस्तानंतर होमगार्ड वाऱ्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

diwali festival home guard lockdown impact story nipani


कोरोना काळातील मानधनही नाही

ऐन दिवाळीत अंधार: कोरोना बंदोबस्तानंतर होमगार्ड वाऱ्यावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्ड) आजतागायत कोरोनाकाळातील मानधन दिलेले नाही. शिवाय कोरोना बंदोबस्ताचे काम संपल्यानंतर ते वाऱ्यावर आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत होमगार्डच्या कुटुंबीयांमध्ये अंधार पडला आहे.  


कोरोनाकाळात बंदोबस्तासाठी १४६ गृहरक्षक दलाच्या जवानांना ड्यूटीवर बोलाविले होते. कोरोना काळात काम करून घेतल्यानंतर शासनाने निधी नसल्याचे कारण देत जूनपासून त्यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गृह खात्याने आदेश काढले असून त्यात प्रादेशिक वाहतूक खाते वगळता सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक कार्यालयातील होमगार्डसना तातडीने कार्यमुक्त केले. शिवाय होमगार्डसचा मानधनाचा प्रश्न अधांतरी ठेवला आहे.लॉकडाउनच्या अडचणीच्या काळात पोलिसांना कायदा सुव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी शासनाने या जवानांना कामावर ठेवले होते. मात्र आता दिवाळीत रोजगाराचे साधन नसलेल्या गृहरक्षक जवानांना घरी बसविण्याच्या निर्णयाने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

चिक्कोडी तालुक्यात ७२, निपाणी तालुक्यात ४२ तर एका मुगळी गावात ३२ होमगार्ड आहेत. मार्चपूर्वी प्रत्येक होमगार्डला दिवसाला ३८० रुपये रोजगार मिळत. वर्षातून १८० दिवसच त्यांना रोजगार दिला जातो. एप्रिल महिन्यापासून त्यांच्या मानधनात वाढ करून दर दिवशी ७५० रुपये मानधन केले आहे. बंदोबस्ताचा आदेश आल्यानंतर ड्युटीवर गेले नाही तर अपात्रतेची नोटीस पाठवून पुन्हा कामावर घेतले जात नाही. त्यामुळे होमगार्डसना दुसरीकडे नोकरीही करता येत नाही. त्यांना पेन्शन, फन्ड, ग्रॅच्युईटी, विमा संरक्षण, वैद्यकीय सुविधाही नसते. ड्यूटीवर असतानाही बऱ्याचदा प्रवास, निवास, भोजन भत्ते मिळत नाहीत. ड्यूटी मात्र पोलिसांप्रमाणेच करावी लागते. जिवाला धोका तेवढाच असतो. पण आजतागायत त्यांची कोणी दखल घेतलेली नाही.

'गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती, उत्सव, निवडणुका, संप, आपत्ती व्यवस्थापन या काळातच होमगार्डला रोजगार मिळतो. इतरवेळी तोकसा जगतो, त्याचा संसार कसा चालतो. याकडे कुणीही पहात नाहीत. कोरोना काळातील मानधन अद्याप मिळालेले नसून लवकरच मिळेल, असे सांगण्यात आले आहे.'
-एस. डी. निंबाळकर, होमगार्ड युनिट ऑफिसर, निपाणी