बाळ जन्मले पण आईचा मृत्यू झाला अन् त्याची मृत्यूशी झुंज सुरू झाली पण...

doctor save life for new newborn baby in kolhapur
doctor save life for new newborn baby in kolhapur

कोल्हापूर - त्यांची आई कोरोना पॉझिटीव्ह होती. डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल झाली. डिलिव्हरी झाली, बाळ जन्मले पण आईचा मृत्यू झाला. त्याच क्षणापासून बाळाची मृत्यूशी झुंज सुरू झाली. बाळाचे हृदय आणि श्‍वास दोन्हीही चालत नव्हते.

डॉक्‍टरांसाठी पहिला तास गोल्डन आवर होता. कुटुंबातील इतर ही पॉझिटीव्ह असल्यामुळे कोणीही नातेवाईक रुग्णालयात येऊ शकत नव्हते. बाळाचे वडीलसुद्धा क्वॉरंटाईन होते. अखेर नातवाईकांशी फोनवरूनच झालेल्या संभाषणावरून डॉक्‍टरांनी प्रयत्नाची पराकष्ठा सुरू केली. 

जन्मापासूनच ते बाळ स्वतंत्र आय.सी.यु. सारख्या यंत्रणेत होते. सर्व डॉक्‍टर, नर्स, आय्या, वॉर्डबॉय यांनीही मनावर घेतले आणि आई नसलेल्या बाळाला जगविण्याची जिद्द ठेवली. पहिला तास त्यांच्यासाठी आणि बाळासाठी महत्वाचा होता. आई पॉझिटीव्ह असल्यामुळे बाळाचाही स्वॅब घेण्याचा निर्णय झाला. आयुष्याची सुरवात होतानाच त्या बाळाने थेट पीपीई कीट घातलेले डॉक्‍टर, नर्स, आया पाहिल्या. उपचार सुरू झाले. 

पहिल्या तासात मिनिटामिनिटांच्या नोंदी आणि औषध सुरू होते. डॉक्‍टरांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आणि जन्मलेल्या पहिल्या काही मिनिटांतच डॉक्‍टरांनी त्या बाळाचे हृदय आणि श्‍वास सुरू केला. मात्र पुढे ते तग धरू शकेल अशी स्थिती त्या क्षणी तरीही नव्हती. तासाभराने बाळाकडून प्रतिसाद मिळू लागला.

डॉक्‍टरांनी धडपड सुरू ठेवली. अवघ्या एक दिवसांच्या बाळाचा स्वॅब नाक आणि घशातून घेतला. अहवाल येऊ पर्यंत तीन दिवस ते बाळ आयसीयु मध्येच स्वतंत्र होते. डॉक्‍टर, ऑफिस बॉय, नर्स, आया सर्वजण त्या खोलीत पीपीई किट घालूनच जात होत्या. चार दिवस ही लढाई सुरू होती. तरीही त्यांच्या कुटुंबियांना बाळ पाहण्यास मिळाले नव्हते. बापाला सुद्धा बाळाचा चेहरा पाहता येऊ शकत नव्हता. त्या बाळासाठी तेथील नर्स आणि आय्याच त्या क्षणी आई-बापाचे काम करीत होत्या. अखेर चार दिवसांनी बाळाचा अहवाल निगेटीव्ह आला आणि डॉक्‍टरांना दिलासा मिळाला. 

आई पॉझिटीव्ह होती, त्यामुळे बाळ सुद्धा पॉझिटिव्ह असण्याची शक्‍यता होती. त्यामुळे काळजी घेवूनच डॉक्‍टरांकडून उपचार सुरू होते. पुढे बाळ निगेटीव्ह आल्यामुळे पीपीई किट न वापरता त्याच्यावर उपचार होऊ लागले. पाहता पाहता आठ दिवस होऊन गेले. आज बाळ हसू लागले, दूध पिऊ लागले आणि डॉ.गोपाळ वासगावकर यांच्यासह त्यांच्या सर्व स्टाफला एकच आनंद झाला. आपली धडपड सार्थक ठरल्याचा, आपण बाळासाठी "आधार' ठरल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. 


पहिल्यांदा काकाने पाहिले बाळाला 
बापच क्वॉरंटाईन असल्यामुळे नवव्या दिवशीही बाळाचा चेहरा त्यांना पाहता आला नाही. मात्र मिलिटीरीत असलेला बाळाच्या काकाने आज बाळाचा चेहरा पाहिला. आई नसलेल्या बाळाला आई-बापा प्रमाणेच प्रेम देऊन त्याला जगविले. आता ते बाळ सुखरूप आहे. धोक्‍यापासून बाहेर आहे. एका खासगी रुग्णालयातील ही घटना. 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com