डाॅक्टर म्हणतात, आम्ही घेणार, तुम्हीही लस घ्या

0
0

कोल्हापूर : लसीकरणावेळी पहिल्यांदा आम्ही लस घेणार आहोत. त्यामुळे न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या, असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांनी गुरूवारी येथे केले.

जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 16) होणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, डॉक्‍टर्स, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत माहिती दिली. 

श्री. देसाई म्हणाले, "शनिवारी पहिल्या टप्प्यात सर्वांच्या सहकार्याने लसीकरण यशस्वी करूया. दुसरा, तिसरा टप्पाही यशस्वी करण्यासाठी जनजागृती करावी. स्वत:च्या आणि कुटुंबीयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.'' 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, "व्हॅक्‍सिन अत्यंत सुरक्षित आहे. याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, मास्क यासारख्या सुरक्षिततेचा अवलंब करण्यात येणार आहे.'' होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जगताप म्हणाले, ""कोव्हिशिल्ड व्हॅक्‍सीन सुरक्षित असून ते सर्वांनी घ्यावे. प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.'' मानसोपचार तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. पद्मराज पाटील म्हणाले, "लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. या मोहिमेत आम्ही स्वत: प्रथम सहभागी होणार आहे. आम्ही लस घेतल्यानंतर निश्‍चितपणे आपणामधला आत्मविश्वास वाढेल.''  जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरीष पाटील म्हणाले, "लसीकरणामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल. प्रत्येकाने निर्भीडपणे ही लस घ्यावी.''  

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के म्हणाले, ""वर्षभर आपण कोरोनाशी झगडत शासन, आरोग्य विभाग आणि प्रशासनाने आटोक्‍यात आणले आहे. या लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्‍ट नाहीत. न घाबरता ही लस घ्यावी आणि कोरोनामुक्त वर्षाकडे वाटचाल करू.'' निमा असोसिएशनचे सचिव डॉ. राजेंद्र वायचळ म्हणाले, ""कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लस घ्यावी. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.'' रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष बाबा जांभळे म्हणाले, ""लस सुरक्षित आहे. सर्वांनी ती घ्यावी.'' 

यावेळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, रोटरी क्‍लबचे सदस्य डॉ. आर. ए. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, जमाते उलेमाचे अरिफसाहेब हवलदार, सिटी लायन्स आय हॉस्पिटलचे सचिव नरेंद्र पाध्ये, डॉ. अनिता सयबन्नावर, निमाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी उपस्थित होते. 

पहिल्या टप्प्यात सगळे डॉक्‍टर्स, आरोग्य सेवक ही लस घेत आहोत. सर्वांनी ही लस घेवून कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा.

- डॉ. शीतल पाटील, सचिव केएमए

 
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी होणाऱ्या लसीकरणाचा सर्वांनी फायदा घ्यावा.
 - डॉ. गीता पिल्लाई, सचिव मेडिकल असोसिएशन


संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com