'त्या' डॉक्टर महिलेने दिला आत्महत्येचा दिला इशारा अन्..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सदर डॉक्टर महिला व तिचा पती मुंबईहून बेळगावात आले होते. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कोगनोळी टोल नाक्यावर त्यांची नोंदणी झाली होती.

बेळगाव - मुंबई येथून आल्यानंतर थेट होम क्वारंटाईन झालेल्या एका डॉक्टर महिलेच्या विरोधात महापालिकेने खडे बाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या महिलेला व तिच्या डॉक्टर पतीला शहरातील एका हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे. विलगिकरण केल्यांनातर त्या डॉक्टर महिलेने काही जणांना व्हाट्सअप मेसेज पाठवून प्रशासनावर टीका केली होती. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल पाठवून आत्महत्येची धमकी दिली होती. जिल्हाधिकार्यांनी हा प्रकार महापालिका आयुक्त के एच जगदीश यांना याबाबत माहिती दिली. संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली. आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यावर संबंधित महिलेच्या विरोधात कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्या नावे खडे बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या तक्रारीची पडताळणी करून पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत.

वाचा - विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच... 

सदर डॉक्टर महिला व तिचा पती मुंबईहून बेळगावात आले होते. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कोगनोळी टोल नाक्यावर त्यांची नोंदणी झाली होती. त्यांना बेळगावात गेल्यानंतर सिपीएड मैदानावर जाऊन नोंदणी करण्यास संगण्यात आले होते. तेथे गेल्यावर त्या दांपत्याला संस्थात्मक विलगिकरण कक्षात दाखल केले जाणार होते. पण डॉक्टर दांपत्य सिपीएड मैदानावर न जाता थेट घरी गेले. त्यांची माहिती कोगनोळी येथून महापालिकेला मिळाली होती पण ते सिपीएड मैदानावर न आल्यामुळे त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांचा शोध घेऊन त्यांचे विलगिकरण करण्यात आले पण त्यांनी विरोध केला होता. डॉक्टर महिलेने त्यावेळी पोलीस व महापालिका प्रशासनावर टीका केली होती. विलगिकरण कक्षात गेल्यावरही त्या महिलेची तक्रार सुरुच होती. अन्यायकारक पद्धतीने आपले विलगिकरण करण्यात आले असा आरोप त्या डॉक्टर महिलेने केला होता. त्याबाबतचे संदेश समाजमाध्यमांवर पाठविले होते. त्यापूढे जात थेट जिल्हाधिकाऱ्यांना इमेल पाठवून थेट आत्महत्येचा इशारा त्या महिलेने दिला. त्यामुळे ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी व महापालिका प्रशासनने गांभीर्याने घेतली. त्या महिलेच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली. विना परवाना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केल्याबद्दल गेल्या आठवड्यात तिघांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आता हे दुसरे प्रकरण घडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor woman gave warning of suicide to belgaum administration