
कोल्हापूर ः शिवसेनेत गद्दार कोण आहे, याचा शोध घ्या. आगामी निवडणुकीत अशा गद्दारांना उमेदवारी देऊ नका, असा सूर आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आज उमटला.
पक्षसंघटनेत मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण असले तरी त्याचा पक्षावर परिणाम होतो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच शहर शिवसेनेतील मतभेद संपुष्टात आणण्यासाठी समन्वय साधू, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.
ग्रामपंचायत तसेच मनपा निवडणुकीसंबंधी त्यांनी आज आजी, माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. शिवसेनेत गद्दार कोण आहे, त्याचा शोघ घ्या आणि पुढील निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नका, असा सूरही नंतर झालेल्या बैठकीत उमटला.
शासकीय विश्रामधाम येथे दुपारी मंत्री उदय सामंत यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सामंत म्हणाले, ""ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच कसे होतील, सदस्य कसे निवडून येतील, यासाठी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहोत. त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू आहे.''
शहर व जिल्हा शिवसेनेतील मतभेदावर ते म्हणाले, ""मतभेद असावेत; मात्र मनभेद असू नये. मतभेद असणे हे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण असले तरी पक्षसंघटनेवर त्याचा परिणाम होतो. दोन्ही गटांत समन्वय साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.''
दरम्यान, तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा सामंत यांनी घेतला. नंतर जिल्हा तसेच शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
महापालिकेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय
बैठकीत शिवसेनेत गद्दार कोण, यावर चर्चा झाली. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढील निवडणुकीत उमेदवारी देऊ नका, असा सूरही बैठकीत उमटला. महापालिका निवडणुकीला ताकदीने सामोरे जा, एकजूट दाखवा, सत्तेपर्यंत जाईपर्यंत स्वस्थ बसू नका, असा सल्लाही देण्यात आला. मनपा निवडणूक स्वबळावर लढवायची की स्वतंत्रपणे, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेऊ, असेही बैठकीत ठरले.
संपादन - यशवंत केसकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.