सांगलीत झालं बारसं; कमलम'च्या आधी झालं "गुंजाली'" 

जयसिंग कुंभार
Wednesday, 20 January 2021

गुजरातमध्ये हे फळ आता कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाईल.

सांगली:  द्राक्ष, बोरे, डाळिंबासाठीची गुंतवणूक आणि दरातील सततचे चढउतारांमुळे  पिकांना पर्याय म्हणून जत तालुक्‍यात येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीच्यावतीने ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. गेल्या चार पाच वर्षात केवळ जत तालुक्‍यात सुमारे दिडशें एकरांवर या फळाची लागवड झाली आहे. जतच नव्हे तर आता खानापूर, आटपाडी तालुक्‍यातही आता ही लागवड सुरु झाली आहे. 

हेही वाचा- ग्रामस्थ योजना यशस्वी करतात तर तुमच्या का होत नाहीत? असा सवाल केला 

उत्पादनाचा खर्च कमी
"येरळा'ने हे फळ या भागात रुजावे यासाठी नेदरलॅन्डचे तज्ज्ञ पथकही आणले होते. उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, बाजारपेठ मिळवून देणे असे यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला चांगलेच यश आले असून द्राक्षबागायतदार शेतकरी या पिकाकडे वळत आहे. कमीत कमी पाणी आणि औषध खर्च यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. त्यामुळे हे फळ जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी आधार ठरतेय. बाजारपेठेत दरही चांगला मिळत आहे.

"कमलम'च्या आधी झालं "गुंजाली' 

देशात शहरे आणि रस्ते बदलण्याच्या भाजपच्या मोहिमेच्या कचाट्यातून आता फळंही सुटलेली नाहीत. आता ड्रॅगन फ्रुटचे नामकरण कमळासारखे दिसते म्हणून कमलम करण्याचा निर्णय गुजरातचे  मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घेतला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हे फळ आता ड्रॅगन फ्रूट उर्फ कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाईल. मात्र त्याआधीच सांगलीत पाच वर्षापुर्वी या फळाचं नामकरण गुंजाली असं करण्यात आलं आहे. ते केलं आहे जत तालुक्‍यात विकासात्मक कामे करणाऱ्या येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीनं.  

पाच वर्षापुर्वी या फळलागवडीला प्रोत्साहन देतानाच प्रसिध्द केलेल्या माहिती पुस्तकातच या फळाचे बारसे करण्यात आले होते. आता जत भागात या फळाला ड्रॅगन फ्रुटबरोबरच गुंजाली म्हणूनही ओळखतात. या बारशाबाबत येरळाचे सचिव एन.व्ही.देशपांडे म्हणाले,""या फळाचं भारतीय नाव काय असावं असा विचार आला तेव्हा आम्ही लाल आणि गुलाबी रंगाचं फळ आणि आम्ही जालीहाळ परिसरात काम करतो म्हणून एकत्रित असं "गुंजाली' असं नाव दिलं. उच्चाराला सोपं आणि प्रादेशिकतेशी नातं सांगणारे नाव आम्ही निवडलं आणि ते आता रुजलंही आहे.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dragan food birth first name sangli