पुणे-मुंबईला भाडे आहे, पण चालकांनी घेतलाय क्वारंटाईनचा धसका

दीपक कुपन्नावर
गुरुवार, 9 जुलै 2020

वाहनधारकांचा व्यवसाय गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. येथील कचेरी रोडवरील दर्ग्यासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत या वाहनांचा अड्डा आहे. शंभरहून अधिक चारचाकी, तर आठहून अधिक मिनीबस या ठिकाणी भाड्यासाठी उपलब्ध आहेत.

गडहिंग्लज : चांगल्या चालकांना (ड्रायव्हर) सर्वत्रच मागणी आहे. लॉकडाउननंतर चाकरमान्यांना पुणे-मुंबईला नोकरीसाठी बोलावणे सुरू झाले आहे; परंतु अद्याप जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू झालेली नाही. त्यासाठी खासगी गाडीने जाण्याची तयारी अनेकांनी केली आहे; परंतु चालकांनी क्वारंटाईनचा धसका घेतला असून जिल्ह्याबाहेर पडण्यास ते नकार देत आहेत. परिणामी वाहन व्यावसायिकांसह प्रवाशांपुढे पेच निर्माण झाला आहे. 

वाहनधारकांचा व्यवसाय गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. येथील कचेरी रोडवरील दर्ग्यासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत या वाहनांचा अड्डा आहे. शंभरहून अधिक चारचाकी, तर आठहून अधिक मिनीबस या ठिकाणी भाड्यासाठी उपलब्ध आहेत. सुमारे 200 हून अधिक कुटुंबे या वाहन व्यवसायावर अवलंबून आहेत. गेल्या महिनाभरापासून काही अटी शिथिल करून प्रवासास मान्यता दिली आहे. त्यामुळेच वाहन व्यावसायिकांना आशेचा किरण दिसत होता. 

आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेलाही बहुतांश वेळा विलंब होत आहे. सर्वांना परवडणारी बससेवा अद्याप जिल्ह्याबाहेर सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडे आहे. प्रवाशांची नड लक्षात घेऊन ट्रॅव्हल्सचालकांनी भाडे चौपटीने वाढविले आहे. पुणे-मुंबईला नोकरीत असणाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी बोलावणे आले आहे.

अशा गरजू प्रवाशांकडून वाहनांची चौकशी केली जात आहे; परंतु रेड झोनमध्ये प्रवास केल्यास स्थानिक प्रभाग आणि ग्राम समितीतर्फे सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागत आहे. त्यासाठी चालकांची मानसिकता नाही. त्यातच ई-पासमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातूनच संबंधित गावात ड्रायव्हरने केलेल्या प्रवासाची माहिती देऊन क्वारंटाईनबाबत आदेश येत असल्याने कोंडी झाली आहे. 

कुटुंबाची आबाळ
मुळातच चालकांचे हातावरचे पोट आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कामच नसल्याने मिळेल ते काम करून गुजराण सुरू आहे. अशा परिस्थितीत रेड झोनमध्ये जाऊन 14 दिवस क्वारंटाईन व्हायला लागत असल्यामुळे कुटुंबाची आबाळ होऊ शकते. 
- विजय पाटील, चालक- गडहिंग्लज. 

व्यावसायिकांची ससेहोलपट
मुंबई, पुण्याला प्रवासासाठी ग्राहक आहेत; परंतु येताना गाडी मोकळीच आणावी लागणार आहे. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यातच क्वारंटाईनच्या भीतीने चालकही मिळेनासे झाल्याने वाहन व्यावसायिकांची ससेहोलपट सुरू आहे. 
- महेश गाडवी, वाहन व्यावसायिक- गडहिंग्लज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Drivers Fear About Quarantine Kolhapur Marathi News