
काही दिवसांपासून गायब झालेल्या राखेने पुन्हा जयसिंगपूरकरांची डोकेदुखी वाढवली आहे. ती येतेच कुठून याचे उत्तर नागरिकांना अद्याप मिळालेले नाही.
जयसिंगपूर : काही दिवसांपासून गायब झालेल्या राखेने पुन्हा जयसिंगपूरकरांची डोकेदुखी वाढवली आहे. ती येतेच कुठून याचे उत्तर नागरिकांना अद्याप मिळालेले नाही. पालिकेच्या आरोग्य विभागानेही अद्याप याची माहिती घेतलेली नाही. प्रदूषण नियंत्रण विभागाकडूनही याप्रश्नी ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. पर्यावरणासह शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ज्या विभागाची जबाबदारी आहे त्या विभागाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दोन महिन्यांपासून शहराच्या प्रत्येक भागावर राखेचा वर्षाव होत आहे. शाहूनगर परिसरात याचा प्रादुर्भाव अधिक आहे. यापूर्वी रात्री पडणारी राख आता दिवसाही पडू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी काही प्रमाणात राखेचे प्रमाण कमी झाले होते; मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा दिवस-रात्री शहरावर राखेचा वर्षाव होत आहे. मुळात ही राख येतेच कुठून, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
आम आदमीचे आदम मुजावर यांनी याप्रश्नी पालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदन देऊनही कारवाईचे आश्वासन मिळत नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना राख येते कुठून, याचाही शोध घेतला जात नसल्याने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला असतानाही यंत्रणेची हालचाल नसल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पाटील-चिंचवाडकर यांनीही प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांना राखेच्या प्रदूषणाची माहिती देऊनही अधिकाऱ्यांकडून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेहमीच मास्कचा वापर
या आधी रात्रीच्या वेळी पडणारी राख आता दिवसाही पडू लागल्याने तासातासाला गाडी पुसण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. याशिवाय झाडांवरही राखेचे थर साचू लागल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना आता नेहमीच मास्कचा वापर करणे गरजेचे बनले आहे.
संपादन - सचिंंन चराटी
kolhapur