
कोवाड : ताम्रपर्णी नदीवरील दुंडगे (ता. चंदगड) बंधाऱ्यांची पडझड होत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. दुंडगे ग्रामस्थांनी बंधाऱ्याच्या नवीन बांधकामाच्या मागणीचे निवेदन त्यांनी दिले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी निवेदनाची गरज नाही. बंधाऱ्याचे बांधकाम करण्याबाबत आमदार राजेश पाटील व माझे यापूर्वीच ठरल्याचे सांगितले. या वेळी "दुंडगे बंधाऱ्याबाबत आमचं ठरलयं'ची जोरदार चर्चा रंगली. दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास लवकरचं बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावू, असा दिलासा दिल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दुंडगे व कुदनूर गावाला जोडणारा हा बंधारा उभे राहिल्यामुळे राजगोळी परिसराच्या विकासाला गती मिळाली. गेल्या 15 वर्षांपासून या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू झाली. अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर कर्नाटकची हद्द असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना हा जवळचा मार्ग उपलब्ध झाला. त्यामुळे बंधाऱ्यावरून रहदारी वाढली. बंधाऱ्याची उंची जास्त व रुंदी कमी असल्याने बंधारा वाहतुकीला धोकादायक ठरू लागला.
गेल्या दहा वर्षांपासून बंधाऱ्याची पडझड सुरू झाली. सध्या बंधाऱ्याची अवस्था धोकादायक असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दुंडगे व कुदनूर भागातील प्रवाशांनी नवीन बंधाऱ्याच्या बांधकामाची मागणी लावून धरली आहे. रविवारी पालकमंत्री सतेज पाटील हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कोवाड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी बंधाऱ्याला भेट दिली. अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली व उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी आमदार राजेश पाटील व आमचे बंधाऱ्याच्या बांधकामाबाब या अगोदरच ठरल्याचे सांगितले.
जुन्या बंधाऱ्यांची दखल
आमदार राजेश पाटील यांनी ताम्रपर्णी नदीवरील कामेवाडी, दुंडगे, कोवाड, माणगाव या चारही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची अवस्था बिकट झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांना दिली. आमदार पाटील यांनी 60 ते 65 वर्षांपूर्वीचे हे बंधारे असल्याने त्यांची पडझड सुरू असल्याचे निदर्शनाला आणून दिल्याने पालकमंत्री पाटील यांनी बंधाऱ्यांच्या दर्जाबाबत संबंधित खात्याकडून माहिती घेऊन ठरवू, असे सांगितले.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.