शंभर दिवसांत आठ लाख 82 हजार घरे बांधणार ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

100 दिवसात आठ लाख 82 हजार 135 घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे

कोल्हापूर - राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत "महाआवास अभियान-ग्रामीण' राबविले जाणार आहे. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या 100 दिवसात आठ लाख 82 हजार 135 घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. 

या अभियानामध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण 16 लाख 25 हजार 615 इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी 11 लाख 21 हजार 729 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. या 100 दिवसांच्या अभियान कालावधीत उर्वरित 5 लाख 03 हजार 886 घरकुलांना मंजूरी देण्याचा मानस आहे. तसेच या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता रक्कम 15 हजार रुपये प्रमाणे 750 कोटी रुपये वितरीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. मुश्रीफ यांनी दिली. 

शासनामार्फत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत सर्वसाधारण क्षेत्राकरिता 1 लाख 20 हजार रुपये व डोंगराळ, नक्षलग्रस्त क्षेत्राकरिता 1 लाख 30 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या व्यतिरिक्त मनरेगाअंतर्गत 90 दिवसांची अकुशल मंजूरी 18 हजार रुपये तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता 12 हजार रुपये अनुदान असे एकूण अनुक्रमे 1.50 लाख व 1.60 लाख रुपये अर्थसहाय्य घरकुल बांधकामासाठी देण्यात येते. यातून किमान 269 चौरस फूट आकाराचे घर बांधणे अपेक्षित आहे, अशी माहिती श्री. मुश्रीफ यांनी दिली. 

हे पण वाचापदवीधर निवडणूक बेकायदेशीर ; अॅड. असिम सरोदे
 
मुश्रीफांच्या घोषणा 
1. प्रत्येक पंचायत समितीच्या आवारामध्ये 1 डेमो हाऊसची निर्मिती करणार 
2. भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणार
3. शासनाच्या विविध योजनांशी कृतीसंगम करणार 
4. घरकुल लाभार्थ्यांना बॅंकेमार्फत 70 हजार रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न 
5. नाविन्यपूर्ण बाबी राबविण्यात येणार 
6. उत्कृष्ट कार्याचा गौरव 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight lakh 82 thousand houses will be built in one hundred days Rural Development Minister Hasan Mushrif