
गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सुरुवातीला सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली होती.
कोल्हापूर - कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आज दिले. यामुळे जिल्ह्यातील "गोकुळ', "केडीसी'सह साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. ज्या टप्प्यावर संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या तेथून पुढे प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आहेत. ही प्रक्रिया (ता. 18) सुरू करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सुरुवातीला सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्यात आली, तर त्यानंतर पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुकांना स्थगिती होती. दरम्यानच्या, मुदतीत निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या काही संस्थांना उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने राज्यातील सात जिल्हा बॅंकांसह 38 संस्थांचा कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश यापूर्वीच प्राधिकरणाने दिले होते. तथापि इतर संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगितीची मुदत संपूनही नवा आदेश निघाला नव्हता. आज प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी या संदर्भातील आदेश काढून सर्वच सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
डिसेंबर 2020 अखेर राज्यातील 45 हजार संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. जानेवारी 2021 मध्ये त्या घेण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रिया सुरू करायच्या जिल्ह्यातील सर्वच संस्थांचा समावेश असलेला "जिल्हा निवडणूक आराखडा' प्राधिकरणाने मागवला होता. या आराखड्यानुसारच आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यातून 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांना वगळण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्कचा, थर्मल स्क्रिनिंग आदींचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे पण वाचा - ताराराणींच्या पुतळ्यासाठी मॉडेल म्हणून धरमाबाईचा चेहरा
जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या संस्था
नागरी बॅंका- 24
पतसंस्था - 300
विकास सोसायट्या - 925
पगारदार पतसंस्था - 53
औद्योगिक संस्था - 29
प्रक्रिया संस्था - 13
खरेदी विक्री संघ - 12
मध्यवर्ती ग्राहक संस्था - 5
इतर "ब' वर्ग संस्था - 11
प्रमुख संस्था
गोकुळ, जिल्हा बॅंक, पार्श्वनाथ बॅंक, गव्हर्न्मेंट सर्व्हंटस बॅंक, कोल्हापूर अर्बन, कोल्हापूर महिला, प्राथमिक शिक्षक, कोजिमाशी, यूथ डेव्हलपमेंट, श्रीपतरावदादा, शामराव शिंदे, दि गणेश बॅंक
संपादन - धनाजी सुर्वे