मारुतीचे मारुति, सरकारीचे सरकारि ; मराठी मतदारयादीत चुकाच चुका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

मतदारयादीत असंख्य चुका असल्यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.

बेळगाव : लॉकडउनमुळे रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. यामुळे म. ए. समितीच्या मागणीनंतर मराठी भाषिकांसाठी मराठीमध्ये मतदारयादी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, मतदारयादीत असंख्य चुका असल्यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. तहसीलदारांनी याकडे त्वरित लक्ष देऊन चुका दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही आहे.

हेही वाचा - कोकणातील प्रवाशांवर अन्याय : तुतारी एक्‍स्प्रेस सावंतवाडीपर्यंतच 

तहसीलदार कार्यालयाने याआधी केवळ कन्नड भाषेत मतदारयादी प्रसिद्ध केली होती. यामुळे मराठी भाषेतही मतदारयादी उपलब्ध करून देण्याची मागणी तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली होती. लवकरच मराठीतील मतदारयादी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही दिले होते. त्यानुसार यादी दिली जात आहे. मात्र, त्यातील नाव व आडनावात अनेक चुका आहेत. मतदारयादीप्रमाणेच मतदार ओळखपत्रावरही चुका आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

हेही वाचा -  रत्नागिरीत दोन दिवसात पाच अवैध हातभट्ट्यांवर छापे 

कोणत्याही सरकारी कामासाठी आधारकार्डसोबत मतदार ओळखपत्र महत्वाचे असते. मतदान ओळखपत्रात चुका असल्याने अनेक कामे रखडतात. यामुळे अनेकजण मतदान ओळखपत्रावरील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तहसीलकडे जाताना दिसत आहेत. मतदारयादीत मारुतीचे मारुति, सरकारीचे सरकारि, गल्लीला गल्लिम, गिरीचे गिरि, केदारीचे केदारि, प्रज्ञाचे प्रज्डा, कृष्णाचे क्रिष्णा, भाग्यश्रीचे भाग्यार्शि, दिग्विजयचे दिन्निविजय, खणगावकरचे कनगावकर, भावकाण्णाचे भावकन, लखनचे लाखन, यल्लाप्पाचे यल्लपपा, प्रभावतीचे प्रबावति, भागीरथीचे बागिरत, संभाजीचे शंबाजि, बाळगौडाचे भाळगौड यासह अनेक चुका करण्यात आल्या आहेत. 

"मराठीमध्ये मतदारयादी उपलब्ध करून दिली आहे. अंतिम मतदारयादी दिली आहे. चुका दुरुस्त करता येणार नाहीत. आयोगाने वेळ वाढवून दिला तर दुरुस्ती केली जाईल."

-आर. के. कुलकर्णी, तहसीलदार, बेळगाव

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election list of marathi people in belgum various mistake in name problems faced by people in belgum