हेरिटेज आॅफ कोल्हापूर ; हत्तीच्या साहसी खेळाची साठमारी

  उदय गायकवाड
Saturday, 5 December 2020

हत्ती सोंडेने दरवाजाच्या किंवा आगडाच्या वरच्या पोकळीतून सोंड घालून चीडवणाऱ्याला शोधत असे

कोल्हापूर - साठमारी हा शब्द कसा आला, हे अनेकांना समजत नाही आणि तो सामान्य नसल्याने अर्थबोधही होत नाही. कोल्हापूरचा वारसा म्हणून आजही वापराविना टिकून राहिलेली वास्तू समजून घेऊन संवर्धित कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. बडोदा संस्थानात हा खेळ खेळला जात होता. तो पाहून राजर्षी छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात संस्थानचे कार्यकारी अभियंता रावसाहेब विचारे यांच्याकडून आराखडा तयार करून घेतला. रावसाहेब गायकवाड आणि बळवंतराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फिदहुसेन भोरी या ठेकेदाराने २१ नोव्हेंबर १९१३  ते १४ ऑक्‍टोबर १९१६ या काळात ही वास्तू बांधून पूर्ण केली.

रावणेशवराच्या तळ्या काठी ही वास्तू आहे. गोखले कॉलेजकडून छत्रपती शिवाजी स्टेडियमकडे येणाऱ्या रस्त्यावर मुकांबिका मंदिराच्या परिसरात हत्ती बरोबर खेळण्याच्या या खेळाचे मैदान आहे. साठमारीचे प्रवेशद्वार पश्‍चिम दिशेला आहे. त्यावर दोन्ही बाजूला हत्तीचे शिल्प आहेत. त्यातून आत आल्यावर उजव्या बाजूला विवेकानंद आश्रमाच्या नजीक खाशा स्वाऱ्या बसण्याची इमारत व हत्ती बांधण्याची जागा आहे. राज घराण्यांतील स्त्रिया देखील हा खेळ पहाण्यासाठी येत असत.

गेटसमोर खोलात उतरणारा रस्ता असून तो फक्त हत्ती आणि खेळाडू यांच्या साठी आहे. एकावेळी एक हत्ती जाईल एवढ्या रुंदीचा हा रस्ता दोन्ही बाजूंना आडना घालता येईल अशा रचनेसह आहे. 

सुमारे २० फूट उंचीच्या दगडी भक्कम भिंतीनी अडीच एकराचा चौकोनी परिसर बंदिस्त केलेला आहे.

त्याच्या आतील भागात भक्कम दगडी गोलाकार असलेले आगड, पंधरा फूट उंचीचे आगड  असून त्याला चारही बाजूला सहा फूट उंचीचे मोकळे दरवाजे आहेत. आगडाच्या आतील भागातून चारही दरवाजात ये जा करता येईल अशी मोकळीक आहे. उन्माद आलेल्या हत्तीला या मैदानात मोकळे सोडले जात असे. रुमाल दाखवून खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी त्याला चिडवायचे किंवा भाल्याने डिवचून चिडवायचे. त्याने तो आक्रमक झाला की, खेळाडूंच्या मागे लागायचा. अगदी जवळ आला तर खेळाडू आगडाच्या आसऱ्याला जायचे. 

हत्ती सोंडेने दरवाजाच्या किंवा आगडाच्या वरच्या पोकळीतून सोंड घालून चीडवणाऱ्याला शोधत असे. तो शोध घेई पर्यंत त्याला इतरांनी डिवचले तर तो माघारी फिरत असे.  ‘च... ई ‘ किंवा ‘ च..ई  आगड चै... ई ‘ असा खेळातील इशारा खेळाडू देत असत. त्या आवाजाने हत्ती परत फिरला किंवा आक्रमक झाला की, भिंतीवर बसलेले प्रेक्षक जोरदार टाळ्या शिट्ट्यानी दाद देत असत.
हा  प्रकार वारंवार करून हत्तीला दमवले जात होते. चिडलेला हत्ती पूर्णतः नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत शेवटी त्याला जेरबंद करण्यात यश मिळवणे, असा हा खेळ होता. असाच हत्तींच्या टकरीचा खेळही भरवला जात होता. यासाठी भारतातून तज्ज्ञ साठमार संस्थानात आणून त्यांच्या करवी इथले साठमार तयार केले होते. यश मिळवलेल्या खेळाडूंना बिदागी, बक्षिस आणि हत्तीला सुद्धा गूळ तुपाचा गोळा भरवून बक्षीस दिले जात असे. 

हे पण वाचा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय

 

खेळासाठी लागणारी हत्यार बनवून घेतली. हत्तीला जेरीस आणणारे पायाला लावायचे लोखंडी काटे असलेले गोलाकार मोठे चिमटे, टोकदार भाले, साखळ्या, अंकुश, गळ्यात अडवून ठेवायचे नाडे, लंगर, अशी  खेळासाठी वापरात असलेली साधने आजही नव्या राजवाड्यातील संग्रहालयात ठेवण्यात 
आली आहेत. काही दुर्मिळ छायाचित्रं व रेखाचित्रही इथे आहेत. त्यावरून या खेळाचा अंदाज येतो. याच प्रकारचे खेळाचे मैदान सोनतळी, राधानगरी व पन्हाळगडावर छोट्या आकारात आहे. आता हा खेळ कधीच खेळला जाणार नाही, हे खरे असले तरी नव्या तंत्राची मदत घेऊन तो उभा करणे शक्‍य आहे. सद्या हे बुरुज कायम ठेवून टेनिस कोर्ट तयार करण्यात आली आहेत. त्या जागेची त्यामुळे स्वच्छता आणि देखभाल होते. मात्र सामान्य नसलेला हा खेळ प्रकार वारसा स्मृती म्हणून 
जपला पाहिजे.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elephant adventure game of kolhapur sathmari