जा बाबा! तुझ्या पाया पडतो! माजी सरपंचानी केली विनवणी

सुनील कोंडुसकर
Wednesday, 2 December 2020

शेतकऱ्याची हत्तीला विनवणी; सहा महिन्यांत तीन वेळा हत्तीकडून उसाचे नुकसान

चंदगड (कोल्हापूर) : वाघोत्रे (ता. चंदगड) येथील माजी सरपंच मारुती गावडे यांच्या शेतात सहा महिन्यांत तिसऱ्यांदा हत्तीने ऊस पिकावर वरवंटा फिरवला. सोमवारी दुपारीच हत्ती शेतात दाखल झाला. हाकाट्या देऊन, फटाके वाजवूनही त्याने दाद दिली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत हत्ती शेतातच थांबून राहिल्याने घाबरलेल्या गावडे यांनी ‘तुझ्या पाया पडतो, पण शेतातून जा!’ अशी विनवणी सुरू केली. पश्‍चिम विभागातील हे प्रातिनिधीक चित्र करणारे आहे.

हेही वाचा- चंद्रकांतदादा, हॅट्‌ट्रिक नव्हे क्‍लीनबोल्ड! : सतेज पाटील -

पावसाळ्यानंतर कर्नाटकातून या विभागात येणारे हत्ती आता बारमाही दिसू लागले आहेत. हेरे, खामदळे, खालसा गुडवळे, वाघोत्रे, पार्ले, मोटणवाडी, पाटणे, नांदवडे या पट्ट्यात हत्तींच्या कळपाने दहशत निर्माण केली आहे. काबाडकष्टाने पिकवलेले भात, नाचणा, ऊस यांसारखी पिके बघता बघता फस्त केली जात असल्याने शेतकरी अस्वस्थ  आहेत. वन विभागाकडून पंचनामे आणि भरपाईची व्यवस्था केली जात असली तरी शासनाकडून मिळणारा दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. 

योजना नको; भरपाई द्या
शासनाकडून हत्तींना हटवण्याचे प्रयोग केले जातात. ‘एलिफंट गो बॅक‘ मोहीम राबवली. आताही नव्याने ती राबवण्याचे नियोजन आहे; परंतु असे प्रयोग यशस्वी होतीलच असे नाही. या योजना शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारतात. काहीतरी केल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात काहीच लाभ होत नाही. त्यामुळे योजनांऐवजी बाजारभावानुसार भरपाई द्यावी. 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elephant destroy farming in chandgad ajara kolhapur