गावे समृद्ध करा, महाराष्ट्र आपोआपच स्वच्छ, समृद्ध बनेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू करून सबंध देशाला आदर्श दिला...

कोल्हापूर : सरपंचानो, लोकसहभागातून गावेच्या-गावे समृद्ध करा, महाराष्ट्र आपोआपच स्वच्छ आणि समृद्ध बनेल, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्री मुश्रीफ यांनी संवाद साधला. यावेळी गावगाडा चालवताना येणाऱ्या अडचणी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या. 
मुश्रीफ म्हणाले,"स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू करून सबंध देशाला आदर्श दिला, त्यांचेच नाव या योजनेला दिले आहे. अजून अनेक प्रश्न, अडचणी शिल्लक आहेत. हे प्रश्न आपापल्या गावात लोकसहभागातून सोडवा. 

तेरावा वित्त आयोग असेल अथवा चौदावा वित्त आयोग असेल, सरकारने विकास कामासाठी पाठवलेले पैसे तुम्ही वेळेवर का खर्च करत नाही? असा सवाल मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना केला. 

राज्य सरकार दर महिन्याला नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन खर्च करत आहे, याकडे लक्ष वेधत मुश्रीफ म्हणाले, "" कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक कोंडीमुळेच तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व त्यावरील व्याज शासनाकडे घेण्याचा विषय पुढे आला. या पैशातून अर्सेनिक अल्बमसारखी औषधे जनतेला वाटण्याचा उद्देश सरकारचा होता. परंतु, तो खर्च न करता हे पैसे परत ग्रामपंचायतीला द्यावेत, यासाठी प्रयत्न करून निर्णय घेऊ.' 

महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश महिला अध्यक्षा राणी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, जालना जिल्हाध्यक्ष माऊली वायल, शिवाजी आप्पा मोरे, जिल्हाध्यक्ष सागर माने, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, उदयसिंह चव्हाण, राजू पोतनीस, धनाजी खोत, संभाजी सरदेसाई, शिवाजी राऊत, संजय कांबळे, दिग्विजय कुराडे, मारुती कोकितकर, संभाजी सरदेसाई, लक्ष्मण गुडूळकर, दीपक देसाई उपस्थित होते. 

सरपंच परिषदेच्या मागण्या 
* कोरोनामुळे ग्रा. पं.ना विशेष आर्थिक मदत द्या 
* तेराव्या व चौदाव्या आयोगाच्या अखर्चित 
निधी सह व्याजाची रक्कम परत मिळावी 
* संगणक परिचालक नियुक्तीचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या 
* मुदत संपलेल्या ग्रा.पं.वर सरपंचाचीच प्रशासक म्हणून नेमणूक करा 
* सरपंचावर हल्ला झाल्यास आरोपीवर शासकीय 
अडथळ्याचे कलम घालून गुन्हा दाखल व्हावा 
*नवी मुंबईत सरपंचासाठी सरपंच भवन उभारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enrich the villages, Maharashtra will clean