
पर्यावरणमंत्री ठाकरेंना ई-मेल; पंचगंगा, रंकाळा प्रदूषणाची पाहणी करण्याची मागणी
कोल्हापूर : पंचगंगा तसेच रंकाळा तलाव प्रदूषणाच्या पाहणीसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरला भेट द्यावी, तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी ई-मेलद्वारे केली आहे.
रंकाळा तलाव तसेच पंचगंगा प्रदूषणप्रश्नी पर्यावरणीप्रेमींनी आंदोलने केली. न्यायालयात खटले दाखल केले. उच्च न्यायालय, हरित लवाद, उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्देश देऊनही प्रदूषण रोखण्यात यश मिळाले नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध शासकीय स्तरावर तक्रारी दाखल केल्या. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री विषय केला. त्यावर कार्यवाही केली नाही. वातानुकूलित खोलीत बसून प्रदूषणाबाबत चर्चा करू नका, प्रत्यक्ष प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी भेट देऊन निर्णय घ्या, असे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी झाली नाही. देखरेख समिती अस्तित्वात असताना प्रदूषणाची व्याप्ती वाढते आहे. त्याचा परिणाम रंकाळा तलाव व पंचगंगा नदीतील जैवविविधतेवर होत आहे.
जलपर्णीचा विळखा वाढण्याची शक्यता आहे. पंचगंगचे पाणी काळसर व फेसाळयुक्त बनले आहे. मासे मृत झाले आहेत. प्रदूषणाचा विषय सदस्य सचिवांकडे न पाठविता आपण कोल्हापूरला भेट द्यावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे
केली आहे.
संपादन- अर्चना बनगे