फास्टॅग "झोल'ने वाहनधारक "गोल'

Error In Fastag Implementation
Error In Fastag Implementation

गडहिंग्लज : केंद्र शासनाने वाहनधारकांना फास्टॅग सक्तीचा करण्याची पावले उचलली आहेत. त्याला दुसऱ्यांदा मुदतवाढही देण्यात आली आहे. काही वाहनधारकांनी फास्टॅगची अंमलबजावणी केली असली तरी या फास्टॅगच्या झोलचे अनेक कटू अनुभव त्यांना येत आहेत. परिणामी "टोल'धाड सुरूच असून वाहनधारकांना त्याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रिचार्ज शिल्लक असतानाही वाहन ब्लॅक लिस्टमध्ये जाण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबतही वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. 

राष्ट्रीय महामार्ग बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या धर्तीवर उभारले आहेत. यामुळे वाहनधारकांसाठी टोल आकारणी केली जाते. आतापर्यंत महामार्गावरील नाक्‍यावर पैसे देवून टोल घेतला जायचा. आता प्रत्येक वाहनधारकांना फास्टॅग वापरण्याच्या सूचना आहेत. पहिल्या मुदतीत शंभर टक्के अंमलबजावणी न झाल्याने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. बहुतांशी वाहनधारकांनी फास्टॅग सुरू केले आहे. परंतु, त्यांना त्याचे अनेक कटू अनुभव येत असल्याने या पद्धतीबाबतच वाहनधारकांतून शंका उपस्थित होत आहेत. 

विविध खासगी आणि राष्ट्रीयकृत बॅंकांसह मोबाईल कंपन्यांनीही फास्टॅग सर्व्हीस सुरू केली आहे. काही बॅंकांची फास्टॅग सेवा चांगली आहे. परंतु काहींच्या सेवांमध्ये झोल असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळात सध्या फास्टॅगच्या चांगल्या सेवांची रिचार्ज कार्डे उपलब्ध होईनासे झालेत. कार्डांची टंचाई असल्याने त्याची किमतही वाढवल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून होत आहेत. डिपॉजिट, जीएसटीसह कार्ड शुल्क आणि रिचार्ज या सेवांसाठी साडेसहाशे ते सातशे रूपये भरून घेतले जात आहेत. यामध्ये तीनशे रूपयांचे रिचार्ज मिळते. परंतु, काही बॅंकांच्या या फास्टॅग सेवांमध्ये रिचार्ज शिल्लक असतानाही कार्ड "नॉट ऍक्‍टीव्ह' दाखवत आहेत. यामुळे संबंधित वाहनधारकांचे वाहन ब्लॅक लिस्ट केल्याचा संदेश येत आहे. पैसे शिल्लक असूनही वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

फास्टॅगची अंमलबजावणी करूनही रोख रक्कमेद्वारे टोल भरावा लागत असून रिटर्न सेवा मिळत नसल्याने जादा टोलचा भुर्दंडही वाहनधारकांच्या डोक्‍यावर पडत आहे. रिचार्ज कार्ड घेतल्यानंतर पहिल्यांदा संबंधित वाहन फास्टॅगद्वारे टोल नाक्‍यातून सुरळीत पार पडते. त्यानंतरच्या वेळी मात्र कार्ड नॉट ऍक्‍टीव्ह दाखवते. पहिल्यांदा फास्टॅगद्वारे वाहन सुरळीत जाते, नंतर मात्र याच कार्डवर संबंधित वाहन ब्लॅक लिस्टमध्ये कसे जाते, असा प्रश्‍न आहे. फास्टॅग कार्डवर केंद्र शासनाने तक्रार अगर माहितीसाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे. परंतु, या क्रमांकावर डायल केल्यानंतर तो दुसरीकडेच जात असल्याचा अनुभव वाहनधारकांना येतोय. यामुळे संतापात आणखीन भर याचाही संताप व्यक्त होत आहे. 

"रिटर्न'ला नकार 
टोल नाक्‍यावर सिंगल व रिटर्न अशा दोन प्रकारची सेवा मिळते. रिटर्न टोलसाठी सवलत आहे. परंतु, फास्टॅग सुरू झाल्यापासून रिटर्न टोल बंद केल्याचे सांगितले जात आहे. कोगनोळी टोलनाक्‍यावर कोल्हापूरला जाताना सिंगल 70 तर रिटर्न 105 रूपये टोल आहे. परंतु, फास्टॅग असूनही एका वाहनाला ब्लॅक लिस्ट चा रस्ता दाखवत सिंगल टोल भरून घेतला. यामुळे संबंधित वाहनधारकाला जाता-येता 105 ऐवजी 140 रूपयाला टोल पडला. 

उत्तर समाधानकारक नाही
माझ्याकडे फास्टॅग कार्ड आहे. पहिल्यांदा टोल नाक्‍यावर कोणतीच अडचण आली नाही. दुसऱ्यावेळी रिचार्ज शिल्लक असूनही कार्ड चालले नाही. याबाबत टोल नाक्‍यावर चौकशी केली तरी समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ज्या बॅंकेचे कार्ड आहे, तेथेही चौकशी केली. त्यांनीही हात झटकले. टोल फ्री क्रमांक डायल केला. तो फोन दुसरीकडेच जातो. यामुळे फास्टॅगचा घोळ वाहनधारकांच्या डोकेदुखीचा ठरला आहे. 
- डॉ. विशाल किल्लेदार, गडहिंग्लज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com