महापुरात बुडाले तरीही करवीर पंचायत समितीला नवे कार्यालय मिळेना

Even after the floods, the Karveer Panchayat Samiti did not get a new office
Even after the floods, the Karveer Panchayat Samiti did not get a new office

कोल्हापूर : दरवर्षी पावसाळा आला की पंचगंगेच्या महापुराची जशी चर्चा होते, तशीच चर्चा होते ती करवीर पंचायत समितीच्या स्थलांतराची. गेली एक, दोन वर्षे नव्हे तर दोन-तीन दशके या विषयावर काथ्याकूट सुरू आहे. गतवर्षी मोठा महापूर आला आणि पंचायत समिती पाण्याखाली गेली. अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाण्यात गेले. महापूर ओसरल्यानंतर कपाटातून, टेबलखालून साप, बेडूक बाहेर पडू लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. कसल्याही परिस्थितीत पंचायत समितीचे स्थलांतर करायचेच, असा चंग पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी बांधला. आता पुन्हा महापूर येण्याची वेळ आली आहे. मात्र करवीर पंचायत समिती आहे तिथेच आहे. 
कोल्हापूर शहराच्या मध्यावर, शाहू स्माकर भवनच्या बाजूला आणि जयंती नाल्याच्या काठावर करवीर पंचायत समितीची इमारत आहे. ज्या जागेवर ही इमारत आहे ती जागा सध्या मालकी हक्‍कावरुन वादात आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत बांधता येत नाही. दरवेळी काहीतरी तोडगा निघाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात कागदवरती काहीही पर्याय उपलब्ध झालेला नाही. करवीर पंचायत समितीनंतर बहुतांश तालुक्‍यांनी पंचायत समितीसाठी सुसज्ज इमारती बांधल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील सधन, राजकीयदृष्ट्या ताकतवर पंचायत समिती असूनही त्यांना स्वमालकीची इमारत मिळालेली नाही. वर्षोनुवर्षे केवळ चर्चा आणि कोर्ट केसेसमध्येच वेळ जात आहे. 
सध्या जी पंचायत समितीची इमारत आहे ती अत्यंत अपूर्ण आहे. अनेक विभाग हे जिल्हा परिषद, पिवळा वाडा आदी इमारतीत भरत आहेत. पदाधिकारी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठीही सुसज्ज जागा नाही. महत्त्वाचे म्हणजे इमारतीच्या दुरुस्तीसाठीही निधी लावता येत नाही. त्यामुळे भिंतीतून, पत्र्यातून सर्व पाणी कार्यालयात येते. कार्यालयात सतत बदल होत असते. त्यातूनही निधी लावला तर लेखापरीक्षणात याची त्रुटी काढली जाते. त्यामुळे आहे त्या जागेचा वाद मिटवणे, नवीन इमारत बांधणे किंवा पर्याय निघेपर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे एवढेच पर्याय उपलब्ध आहेत. 

कर्मचाऱ्याचा जीव मुठीत घेऊन काम 
पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांची करवीर पंचायत समितीत सत्ता आहे. कॉंग्रेसकडेच गेली अनेक वर्षे पंचायत समितीची सत्ता कायम आहे. मात्र स्थलांतरावर दोन्ही गटात मतभेद आहेत. या मतभेदापोटीच पंचायत समितीच्या इमारतीचे त्रांगडे निर्माण झाले आहे. आज जिल्हा परिषद परिसर असो की शेंडा पार्क, या ठिकाणी पंचायत समितीसाठी नवीन इमारत बांधणे शक्‍य आहे. पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचीही अशीच अपेक्षा आहे. मात्र नेत्यांना सांगणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सर्व उठाठेवीत कर्मचाऱ्यांना मात्र जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.  

 

संपादन- यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com