क्रीडा आयुक्तांचे पत्र बेदखल करून जिल्ह्यातील खेळाडूाना ग्रेस गुणांत डावलले

 By evicting the sports commissioner's letter, the players in the district were given grace marks
By evicting the sports commissioner's letter, the players in the district were given grace marks

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत ग्रेस गुणांसाठी पात्र असूनही कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना गुणांसाठी मुकावे लागले. क्रीडा आयुक्तांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पात्र समजून गुण देण्याची शिफारस पत्राद्वारे केली होती. ती शिफारस विचारात घेतली नसल्याचे दिसत असून 79 खेळाडू गुणांपासून वंचित ठरले आहेत. एकूण 1552 पैकी 1473 खेळाडूंना गुण मिळाले आहेत. 
जिल्हा क्रीडा कार्यालय व विविध क्रीडा संघटनांतर्फे आयोजित राष्ट्रीय, राज्य, विभाग, जिल्हा क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना ग्रेस गुणांची शिफारस केली जाते. मुख्यत: दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी ही तरतूद आहे. राज्यभरातील क्रीडा कार्यालये पात्र खेळाडूंचे प्रस्ताव राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयांकडे पाठवतात. खेळाडू कोणत्या स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाला, त्याला किती गुण द्यावेत, याचा उल्लेख प्रस्तावात असतो. कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा कार्यालयाने यंदा बारावीचे 876, तर दहावीचे 1552 प्रस्ताव ग्रेस गुणांसाठी शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे पाठवले होते. जिल्ह्यातील 1473 खेळाडूंना गुण मिळाले. उर्वरितांच्या गुणपत्रकात मात्र ग्रेस गुणांचा उल्लेख झाला नसल्याने खेळाडू तक्रार करत आहेत. 
सहावी ते नववीत असताना ज्या खेळाडूंनी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले, अथवा सहभाग घेतला, त्यांना ग्रेस गुण द्यावेत, असा शासन निर्णय आहे. फक्त संबंधित खेळाडूने दहावीत असताना सहभाग घेणे आवश्‍यक आहे. कोणताही खेळाडू गुणांपासून वंचित राहू नये, यासाठी तसा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंडळाकडून तशी चूक घडू नये, यासाठी क्रीडा कार्यालयाने तालुकास्तरीय पात्र समजून खेळाडूंना गुण द्यावेत, असे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश वकोरिया यांचे पत्र मे 2020 रोजी मंडळाला दिले आहे. मात्र, या पत्राची दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. तालुकास्तरावर फुटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वॉंदो, व्हॉलीबॉल, योगासन, क्रिकेट, मैदानी, कुस्ती व बुद्धिबळ हे क्रीडा प्रकार गुणांसाठी पात्र आहेत. 

क्रीडा आयुक्तांचे पत्र शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिले होते. त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित होते. ती का झाली नाही, याचे लेखी उत्तर मंडळाच्या कोल्हापूर विभागाने दिलेले नाही. त्या उत्तराची वाट पाहत आहोत. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी. 


क्रीडा आयुक्तांचे मेमध्ये मंडळाला पत्र आले होते. मात्र, आम्ही राज्य शासनाचे ग्रेस गुणांबाबतचे 18 डिसेंबर 2018 व 25 जानेवारी 2019चे परिपत्रक लक्षात घेऊन ग्रेस गुण दिले आहेत. 
- सुरेश आवारी, कोल्हापूर विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. 

संपादन ः यशवंत केसरकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com