कोल्हापुरातच मिळणार पंढरपुरच्या वारीची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पंढरपूरची पायी वारी रद्द झाली असली तरी येथील विविध विठ्ठल मंदिरातच आता पंढरीच्या वारीची अनुभुती मिळते आहे. 

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पंढरपूरची पायी वारी रद्द झाली असली तरी येथील विविध विठ्ठल मंदिरातच आता पंढरीच्या वारीची अनुभुती मिळते आहे. आषाढी एकादशीदिवशी पंढरपुरात ज्या पध्दतीने कार्यक्रम होतात. त्याच पध्दतीने येथेही सर्व कार्यक्रम व धार्मिक विधी होणार असून त्यात वारकरी सांप्रदाय तल्लीन झाला आहे. आषाढी एकादशी दोनच दिवसावर आल्याने आता त्यांचा उत्साह शिगेला पोचला आहे. 

जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी पंढरपूरला 125 हून अधिक पायी दिंड्या रवाना होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे वारीच रद्द झाली असली तरी त्यांची खंत बिलकुल नाही. कारण, निसर्गानेच पायी वारी न करण्याची आज्ञा दिली आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात विठ्ठल आहे, अशी येथील वारकऱ्यांची भावना आहे. आपापल्या गावातच थांबून कोरोनाविरोधातील लढाईला त्यांनी आणखी बळ दिले आहे. 

वीणापूजन व रोज भजन 
पायी वारीला जाता येणार नसले तरी सर्वानुमते सर्व प्रमुख दिंड्यांनी निर्णय घेवून आपापल्या परिसरातील विठ्ठल मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. परंपरेनुसार ज्या दिवशी वारीचे प्रस्थान होते त्या दिवशी परिसरातील दुसऱ्या एखाद्या मंदिरापर्यंत मोजक्‍याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी काढून तेथे वीणापूजन करण्यात आले आहे. ज्या मंदिरात वीणापूजन झाले आहे तेथे दररोज मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत रात्री भजनही रंगले आहे. आषाढी एकादशीदिवशी परंपरेप्रमाणे याच ठिकाणी ज्ञानेश्‍वरीतील नवव्या व बाराव्या अध्यायाचे वाचन होईल. दुपारी व रात्री भजनाचा कार्यक्रम होईल आणि यानिमित्ताने "जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता' असा भाव मनात साठवत विठ्ठलदर्शनाची आनंदानुभुती घेतली जाणार आहे. 

प्रत्येक दिंड्यांची परतीच्या दिंडीची परंपरा वेगळी आहे. काही दिंड्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपापल्या गावाकडे परततात. मात्र, उत्तरेश्‍वर दिंडीचा विचार केला तर ही दिंडी परत येतानाही पायी परत येते. ही दिंडी पंढरपूरला गेली असती तर आठ जुलैला परत कोल्हापुरात आली असती. त्यामुळे त्यादिवशी मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा वीणा विठ्ठल मंदिरात नेवून त्याचे पूजन होईल. सध्या उत्तरेश्‍वर महादेव मंदिरात या दिंडीतर्फे वीणापूजन होवून भजनाचे कार्यक्रम सुरू आहेत. 

नंदवाळची वारीही रद्द
कोल्हापूर ते नंदवाळ ही प्रतिपंढरपूर वारीही यंदा रद्द करण्यात आली. बुधवारी (ता.1) केवळ दहा वारकऱ्यांच्या उपस्थितीत एका वाहनातून पालखी मिरजकर तिकटी येथून नंदवाळकडे रवाना होईल. दरम्यान कोठेही एकही थांबा न घेता पालखी थेट मंदिरात जाईल आणि विविध धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी पुन्हा मिरजकर तिकटी येथे परतणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: experience of Wari in Kolhapur itself