तब्बल तीस वर्षे "तो' आखतोय गणेशमूर्तींचे डोळे 

बी. डी. चेचर 
शनिवार, 4 जुलै 2020

तो बोलत नाही, की त्याला ऐकायला येत नाही. गणेशमूर्तीसमोर बसल्यावर मात्र जागचा हालत नाही. हातात ब्रश घेऊन मूर्तीला रंग देण्यात गुंग तर होतोच.

कोल्हापूर : तो बोलत नाही, की त्याला ऐकायला येत नाही. गणेशमूर्तीसमोर बसल्यावर मात्र जागचा हालत नाही. हातात ब्रश घेऊन मूर्तीला रंग देण्यात गुंग तर होतोच. शिवाय डोळ्यात रंगांची संगती इतकी पक्की बसवतो की, मूर्ती जिवंत असल्याचा भास होतो. एक, दोन नव्हे, तर तब्बल तीस वर्षे मूर्तींचे डोळे आखण्याचे काम तो करतोय. गणेश कुवळेकर असे त्या अवलियाचे नाव आहे. 

गणेशमूर्ती लहान असो की मोठी. तिच्या डोळ्याला रंग देण्याचे काम गणेश करतो. मूर्तीला जिवंत करायचे असेल, तर डोळ्यातील रंगसंगतीचा खेळ जमावा लागतो. रेखीव डोळ्यांना चांगले रंग लागले की मूर्ती उठावदार व आकर्षक दिसते. गणेशला हे काम कसे करायचे, हे सांगायला लागत नाही. संत गोरा कुंभार वसाहतीतील संग्राम वडणगेकर यांच्या कारखान्यात तो काम करतो आहे. वर्षातील बारा महिने गणेशमूर्ती तयार करण्यासह रंग देण्याचे काम करतो. सकाळी दहा ते सायंकाळी सात ही त्याच्या कामाची वेळ. मात्र, कामात तो इतका दंग होतो की, त्याला घड्याळाचे काटे रात्रीचे बारा कधी गाठतात, हेही कळत नाही. 

वडणगेकरांच्या कुटुंबातील तो महत्त्वाचा घटक बनला आहे. वडणगेकर कुटुंबात एखादा सदस्य बाहेरगावी गेला असेल, तर घरची जबाबदारी तोच पेलतो. विश्‍वासू व प्रामाणिक असल्याने कारखान्याच्या किल्ल्या त्याच्याकडेच असतात. गणेशचे वडील रिक्षा चालक आहेत.

त्याचबरोबर ते खडू निर्मितीचेही काम करतात. त्याच्या कलेबाबत लक्ष्मण वडणगेकर म्हणाले, ""गणेशला भलेही बोलता किंवा ऐकता येत नसले तरी तो कलेचा भोक्ता आहे. त्याच्या हातात रंगांचे ज्ञान सामावले आहे. तो गणेशमूर्तींचे डोळे अप्रतिम आखतो.'' 

दृष्टिक्षेप 
- गणेश कुवळेकर गणेश मुर्तीचे डोळे आखण्यात माहिर 
- मुर्तीकार वडणगेकरांच्या कुटुंबातील बनलाय घटक 
- कुवळेकर करतो खडू निर्मितीचेही काम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The eyes of Ganesh idols have been drawing