कोरोनात गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयाचे आरोग्य सदृढ

अजित माद्याळे
Wednesday, 16 December 2020

गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय कार्यरत झाल्याच्या पंधरा वर्षापासून ज्या महत्वपूर्ण सुविधा नव्हत्या, त्या सर्व सोयी-सुविधा कोरोना महामारीच्या निमित्ताने उपलब्ध झाल्या आहेत.

गडहिंग्लज : येथील उपजिल्हा रूग्णालय कार्यरत झाल्याच्या पंधरा वर्षापासून ज्या महत्वपूर्ण सुविधा नव्हत्या, त्या सर्व सोयी-सुविधा कोरोना महामारीच्या निमित्ताने उपलब्ध झाल्या आहेत. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगडसह सीमाभागातील सर्वसामान्य रूग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक यंत्रणानी हे हॉस्पीटल सज्ज झाले आहे. या माध्यमातून ऐन कोरोनामध्ये उपजिल्हा रूग्णालयाचे आरोग्य सदृढ झाले असून हे चित्र भविष्याच्यादृष्टीने दिलासादायक ठरणारे आहे. 

एक तपापूर्वी स्व. बाबा कुपेकर यांच्या प्रयत्नातून पाच कोटीचे उपजिल्हा रूग्णालय उभारले. अपूरी यंत्रणा असूनही या रूग्णालयाने उत्कृष्ठ सेवा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मार्चपासून कोरोनाची महामारी सुरू झाली. सीपीआर रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी येथे उपजिल्हा रूग्णालयाला समर्पित कोविड हॉस्पीटल घोषित केले. कोरोनाच्या अत्यवस्थ रूग्णांसाठी आवश्‍यक ऑक्‍सीजन सेवेची पूर्तता झाली. आयसीयू विभाग कार्यान्वित झाला. कोरोना रूग्णांसाठी कोल्हापूर, सांगलीहून येणारे सिलींडर अपुरे पडू लागल्याने येथे ऑक्‍सीजन प्लान्ट मंजूर केले.

जंबो व ड्युरा सिलेंडर हॉस्पीटलला मिळाले. या सर्व कामांसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि. प. चे सीईओ अमन मित्तल, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे यांचे प्रयत्न आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांचा पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला. 

याशिवाय खासदार संजय मंडलिक यांनी स्व. सदाशिवराव मंडलिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे एक कोटीची यंत्रसामग्री हॉस्पीटलमध्ये कार्यान्वित केली. आमदार राजेश पाटील यांनी आमदार फंडातून रूग्णवाहिका दिली. विद्या प्रसारक मंडळाने सहा आयसीयू बेडची मदत केली. यासह स्वयंसेवी संस्थांनी छोटे-मोठ्या मशिनरी दिल्या. या मदतीने कोरोना साहित्याचाही साठा हॉस्पीटलमध्ये झाला. त्याचा फायदा आता सर्वसामान्य घटकातील इतर आजाराच्या रूग्ण सेवेसाठी होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी सांगितले. 

उपजिल्हा'त आलेली यंत्रसामग्री 
- 56 लाखाचे ऑक्‍सीजन जनरेटर प्लान्ट 
- 5 बेडचा आयसीयू विभाग, त्यासाठी पीएम केअर निधीतून 5 व्हेंटीलेटर्स 
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून सहा हाय फ्लो नोझल ऑक्‍सीजन मशिन 
- 56 खाटांना व ऑपरेशन थिएटरसाठी केंद्रीय ऑक्‍सीजन लाईन 
- डायलेसीस विभाग झाला कार्यान्वित 
- कायमस्वरूपी 180 जंबो, 4 ड्युरा ऑक्‍सीजन सिलेंडर उपलब्ध 
- आयसीयू आणि डायलेसिस विभाग वातानुकूलीत 
- लहान मुलांच्या एआयसीयूमध्ये बेबी वॉर्मर, इनक्‍युबेटर, मल्टि पॅरा मॉनिटर 
- हृदयरूग्णांसाठी आवश्‍यक डिफ्रिसीलेटर मशिन 
- ईसीजी, ऑक्‍सीजन कॉन्स्टेंटर मशिन 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facilities At Gadhinglaj Sub-District Hospital Increased During The Corona Period Kolhapur Marathi News