कोल्हापूर जिल्ह्यातील 529 गावांत कंटेन्मेंट झोन ठरले फेल 6504 कोरोनाग्रस्तांची भर

कोल्हापूर जिल्ह्यातील 529 गावांत कंटेन्मेंट झोन ठरले फेल 6504 कोरोनाग्रस्तांची भर

कोल्हापूर,: ज्या घरात कोरोना बाधित रुग्ण आढळतो, त्या घराभोवतीच्या 500 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून बंदिस्त करण्यात येतो. कोरोनाचा प्रसार या परिसराच्या पलीकडे होऊ नये यासाठी हा झोन केला जातो. तसेच कोरोना बाधित व्यक्‍तीच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेऊन कोरोनाचा प्रसार थांबवता येतो; मात्र जिल्ह्यातील 529 गावातील कंटेन्मेंट झोन निष्प्रभ ठरला आहे. या गावांमध्ये 14 दिवसांनंतरही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. आत्तापर्यंत या गावातून कंटेन्मेंटचा कालावधी संपल्यानंतर तब्बल 6504 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनचे काम चोख होण्यासाठी सर्वच यंत्रणांना कंबर कसावी लागणार आहे. 
कोरोनाचा प्रसार थांबवणे मोठे आव्हान आहे. यासाठी प्रतिबंधतात्मक क्षेत्रात काटेकोर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळला तर बाधित रुग्णाचा परिसर सील करण्यात येतो. तो भाग कंटेन्मेंट झोन निश्‍चत केला जातो. तसेच बाधित रुग्ण ज्या परिसरात फिरला, कोणाला भेटला याचा कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या माध्यमातून शोध घेतला जातो. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून संबंधित घराच्या परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीस बंद केले जातात. एकूण 14 दिवसांसाठी हा झोन तयार केला जातो. जर कंटेन्मेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी झाली तर तो भाग किंवा गाव कोरोनास अटकाव करण्यास यशस्वी ठरते. मात्र जिल्ह्यातील 529 गावांनी कंटेन्मेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी न केल्याने 14 दिवसांनंतरही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ती आरोग्य विभागासह प्रशासनास डोकेदुखी ठरत आहे. 

कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यानंतर हा परिसर पूर्णपणे बंद करणे आवश्‍यक आहे. तसेच या पसिरातील व्यक्‍तींच्या हालचालीवर निर्बंध आणणे, बाधित व्यक्‍ती सापडल्यास लगेच औषधोपचार करून कोरोनाला रोखणे आवश्‍यक आहे. मात्र ग्रामीण भागात तरी अशा प्रकारचे नियोजन होत नसल्याचे वरील आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 
...... 
( कंटेन्मेंट कालावधी संपूनही रुग्ण सापडत असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे) 
तालुका ग्रामपंचायतींचा संख्या सापडलेले कोरोनाचे रुग्ण 
आजरा 28 243 
भुदरगड 39 298 
चंदगड 29 187 
गडहिंग्लज 37 239 
गगनबावडा 8 22 
हातकणंगले 50 1340 
कागल 53 466 
करवीर 89 1626 
पन्हाळा 56 615 
राधानगरी 49 428 
शाहूवाडी 39 328 
शिरोळ 52 712 

एकूण 529 6504 
..... 
कंटेन्मेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी गावातील समित्या, प्रभाग समित्या, स्थानिक प्रशासनाने करणे आवश्‍यक आहे. तसेच तालुका व विभागीय स्तरवरील अधिकाऱ्यांनी यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. कंटेन्मेंट कालावधी पूर्ण होऊनही रुग्ण सापडत असल्याने पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी करणे, संपर्क शोधणे, बाधित भागातील हालचाली बंद करणे, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com