लोडला 1700 रूपये आणि पाच किलो चिकनची ऊस टोळ्यांकडून मागणी

रणजित कालेकर
Monday, 21 December 2020

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ऊस तोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू झाली आहे. 

आजरा : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ऊस तोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू झाली आहे. ट्रकच्या एका लोडला सध्या 1700 रुपये व पाच किलो चिकनची मागणी शेतकऱ्याकडे होत आहे. गडहिंग्लज उपविभागात हे चित्र असून वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे आदीच मेटाकुटीला आलेला शेतकरी टोळ्याकडून भरमसाठ होत असलेल्या तोडणीच्या "खुशाली'मुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. 

तालुक्‍यात ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे. बीड, लातूर, मराठवाडा या परिसरातून ऊस तोडणीच्या टोळ्या आल्या आहेत. कोरोनामुळे तीस ते चाळीस टक्के तोडणी यंत्रणा परजिल्ह्यातून कमी आली आहे. त्यामुळे अपुऱ्या यंत्रणेवर कारखान्यांना अवलंबून राहावे लागत आहे. आजरा तालुक्‍यात दरवर्षी सात- आठ कारखान्यांच्या टोळ्या असावयाच्या यंदा मात्र तीन ते चार कारखान्यांच्या टोळ्या उतरल्या आहेत.

तालुक्‍यात सुमारे नव्वद पर्यंत टोळ्या ऊस तोडणीसाठी कार्यरत आहेत. तोडणी यंत्रणा अपुरी असल्यामुळे शेतकरी ऊस कसा लवकर जाईल यासाठी धडपडत आहे. तो टोळीच्या पाठीमागे फिरत असल्यामुळे त्याचा फायदा टोळ्या घेत आहेत. आजरा साखर कारखाना बंद असल्याने ऊस कुठल्या तरी कारखान्याला पाठवून रान रिकामी करण्याकडे शेतकऱ्याचा कल आहे. त्यामुळे टोळी दुसरीकडे जाईल या भिती पोटी तो मागेल ती खुशाली देण्यास तयार होत आहे.

पुर्वी "स्व' खुशीने शेतकरी कोयता पुजनाला नारळ व दक्षिणा म्हणून पन्नास ते शंभर रुपये देत होता. या काही वर्षात खुशालीचा दर भलताच वधारला आहे. यंदा तर खुशालीने कळस गाठला आहे. पुर्वी लोडला पाचशे ते हजार रुपये दर दिला जात होता. आज तो दोन हजारच्या घरात पोहचला आहे. यंदा आणखीन त्यामध्ये पाच किलो चिकनची भर पडली आहे. 

शेतकरी संघटना गप्प का? 
शेतकरी संघटना ऊस दरासाठी दरवर्षी रस्त्यावर येतात पण, यंदा शेतकऱ्यांची होणारी लुटमार त्यांना दिसत का नाही?, अशी विचारणा शेतकऱ्यांतून होत आहे. शेतकरी संघटनानी दराबरोबरच खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्याची होणारी लुट थांबवणे आवश्‍यक असून अन्यथा शेतकरी भरडला जाणार आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers In Trouble Due To Sugarcane Harvesting Workers Kolhapur Marathi News