
प्रजासत्ताकदिनी जवानांना अभिवादन केले जाईल. पण, या हतबल बापाची दखल अधिकारी, लोकप्रतिनिधी घेणार का, हाच खरा प्रश्न आहे.
जवान गेला पण विम्याची रक्कम काय मिळेना...
कोल्हापूर - सैन्यातील जवान अनिकेत मोळेचा बेळगावच्या मिलिटरी कॅम्पमध्ये सरावादरम्यान मृत्यू झाला. पाच महिने झाले तरीही त्यांच्या विम्याची ३० लाखांची रक्कम वडिलांना मिळालेली नाही. वडील सुभाष मोळे यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. विचारणा करण्यासाठी केलेल्या फोनलाही अधिकारी दाद देत नसल्याने श्री. मोळे हतबल झाले आहेत.
अनिकेत मोळेची विमा रक्कम देण्यास दुर्लक्ष
प्रजासत्ताकदिनी जवानांना अभिवादन केले जाईल. पण, या हतबल बापाची दखल अधिकारी, लोकप्रतिनिधी घेणार का, हाच खरा प्रश्न आहे.घरपण (ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथील सुभाष मोळे शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना देशसेवेसाठी अर्पण केले. मोठा मुलगा सीमा सुरक्षा दलात आहे. तर लहान २२ वर्षाचा अनिकेत भूदलात अरुणाचल प्रदेशात होता. अरुणाचल प्रदेशातून तो पुढील प्रशिक्षणासाठी बेळगावला आला होता. तेथे कवायत करतानाच त्याचा मृत्यू झाला. २८ ऑगस्ट २०१९ ला मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घरपण येथे आणला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर सांत्वनासाठी नेतेमंडळींची रांग लागली होती. मात्र बाराव्या दिवसानंतर त्यांच्याकडे कोणीही पाहिले नाही.
वाचा - व्हिडिओ : लेकीच्या ‘एव्हरेस्ट’साठी बापाची पायाला भिंगरी...
दिवंगत जवानाच्या बापाची हतबलता
अनिकेत जेव्हा भरती झाले, तेव्हा त्यांनी एका बॅंकेत खाते उघडले होते. याचवेळी त्याचा तीस लाखांचा विमा उतरला होता. त्यामुळे कागदपत्रे घेऊन वडील सुभाष बॅंकेत गेले. त्यांनी विमा कंपनीसाठी आवश्यक कागदपत्रे दिली. तीन महिन्याच्या सर्व पूर्तता केली. मात्र यावर अद्याप ही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वडील सुभाष हतबल झाले आहेत.
प्रशासकीय अधिकारी नेते मंडळी त्यांना मदत करणार तरी केव्हा ?
सध्या बॅंकेतील आणि विमा कंपन्यांचे अधिकारी त्यांचा फोन घेत नाहीत. पाठपुराव्यासाठी मोळे यांनी मोठ्या मुलाला घरी बोलवून घेतले आहे. आजच तो कोल्हापुरात दाखल झाला आहे. एका जवानाच्या बापाला मुलाच्या विम्याच्या पैशासाठी यातना होत असताना प्रशासकीय अधिकारी नेते मंडळी त्यांना मदत करणार तरी केव्हा, अशी अपेक्षा वडील सुभाष यांना आहे.
मुलाच्या विम्याची रककम मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. बॅंकेतील आणि विमा अधिकाऱ्यांकडून प्रत्युत्तर मिळत नाही. शवविच्छेदनाचा अहवाल, एफआयआर, पॉलिसी याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, तरीही दाद देत नाहीत. विमा कंपनीकडे पाठपुरावा केला आहे.
- सुभाष मोळे, घरपण (ता. पन्हाळा)