व्हिडिओ : लेकीच्या ‘एव्हरेस्ट’साठी बापाची पायाला भिंगरी...

kasturi savekar trekkers in kolhapur prer for everest kolhapur marathi news
kasturi savekar trekkers in kolhapur prer for everest kolhapur marathi news

कोल्हापूर - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽऽ’ ही घोषणा देताच नसानसांत रोमांच उभे राहतात... महाराज ज्या वाटेने गेले त्याच वाटेवरून आपण पदभ्रमंती करायची, असे सांगून हा बाप आपल्या एकुलत्या तीन वर्षांच्या पोरीला घेऊन बाहेर पडला... पोरीनं आजवर कैक किलोमीटरची भटकंती केली. 
अनेक डोंगर, शिखरं पादाक्रांत केली... ‘मला जगातील सर्वोच्च हिमशिखरावर कोल्हापूरचा झेंडा रोवायचाय,’ अशी इच्छा तिनं व्यक्त केली आणि पोरीचा शब्द खाली पडू देईल तो हा बाप कसला?

बाप-लेकींची धडपड

एका क्षणाचाही विचार न करता त्यानं संमती दिली खरी; पण हा सारा खर्च आहे पंचेचाळीस लाखांवर जाणारा. चारचाकी वाहनं दुरुस्त करणारा हा बाप मात्र घाबरला नाही. तिच्या या स्वप्नासाठी पायाला भिंगरी बांधून तो सर्वत्र धावतो आहे. पै-पै जमवतो आहे आणि दुसरीकडे पोरगी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तितकीच कसून सराव करते आहे. आज (शुक्रवारी) सर्वत्र आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा होणार आहे. मात्र, या बाप-लेकींची धडपड साऱ्यानाच खणखणीत आत्मविश्‍वास देणारी आहे. त्यांनी पाहिलेल्या गरूड भरारी घेण्याच्या स्वप्नांना मात्र समाजातील दातृत्वाच्या पंखांची साथ हवी आहे. 
मंगळवारात राहणारी ही कस्तुरी आणि तिच्या बापाचं नाव दीपक सावेकर. तळपती तलवार चालवणारी, तितक्‍याच चपळाईनं लाठी-काठी खेळणारी, बघता बघता एकेक डोंगर- शिखर सर करणारी, सायकलबरोबरच घोडेस्वारी आणि जलतरणात प्राविण्य मिळवलेली आणि राजमाता जिजाऊंची भूमिका समरसून साकारणारी हीच ती कस्तुरी. आजवरच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर हा बाप तिच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे.

 कस्तुरीनं वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत हिमालयातील तब्बल १३७ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. नेपाळमधील सर्वोच्च एकवीस हजारहून अधिक फूट उंची असलेलं माऊंट मेरा शिखर तिने सर केले आहे. भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने तिला गौरविले आहे. सर्व प्रकारची प्रशिक्षणं तिनं अगदी ‘अ’ श्रेणीत पूर्ण केली आहेत.

खर्चाचा ‘एव्हरेस्ट’

तिच्या या मोहिमांची यादीच इतकी मोठी आहे की ती एव्हरेस्ट नक्कीच सर करू शकते. मात्र, त्यासाठीच्या खर्चाचा ‘एव्हरेस्ट’ गाठण्यासाठी बापाची धडपड सुरू आहे. कधी तो पोरीला घेवून एखाद्या शाळेत, एखाद्या महाविद्यालयात तर कधी विविध संघटनांच्या मीटिंगमध्ये जावून आवाहन करतो आहे. दमणं नावाचं प्रकरण त्याला माहिती नाहीच जणु. कारण पोरीचं स्वप्न तर आहेच पण त्याही पेक्षा जगातील सर्वोच्च शिखरावर कोल्हापूरची पहिली मुलगी देशाचा तिरंगा फडकवणार आहे आणि त्यानंतरच्या जल्लोषाचा आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण त्याला अनुभवायचा आहे. 

एव्हरेस्ट ही खर तर जगातील सर्वात खडतर आणि जोखमीची मोहिम. कस्तुरीची ही सत्तर दिवसांची मोहिम मार्चमध्ये सुरू होईल. एकीकडे निधी संकलन सुरू असताना ती मात्र पहाटे साडेचारपासून कसून सराव करते आहे. सकाळी दोन तास ध्यान व योगा, त्यानंतर सायकलिंग, रनिंग, दुपारी एक तास पुन्हा ध्यान आणि चारपासून सातपर्यंत पुन्हा मैदानावरील व्यायाम ती करते. प्रत्येक रविवारी पहाटे अडीच ते सकाळी नऊ या वेळेत पाठीवर २५ किलो वजन घेवून तीनदा कुशिरे येथून जोतिबा डोंगर चढते आणि उतरते. आता हळूहळू हे वजन आणखी वाढवले जाईल.
- दीपक सावेकर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com