बाप आहे की कसाई ; चौथीही मुलगीच झाल्याने उचलले हे धक्कादायक पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

हा अर्भक पुरुष जातीचा नसून ती मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गडहिंग्लज : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील कुंभार दाम्पत्याचा मृत झालेला अर्भक पिशवीत गुंडाळून हिरण्यकेशी नदीत फेकल्याचा बनाव उघड झाला. अर्भकावर दफनविधी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अर्भकाचा मृतदेह उकरून बाहेर काढला. हा अर्भक पुरुष जातीचा नसून ती मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चौथीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या बापानेच तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला असून, काल रात्री उशिरा त्या दाम्पत्यासह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

धोंडिबा जोतिबा कुंभार व सौ. वनिता दाम्पत्याचे अर्भक आहे. गेल्या आठवड्यात वनिताची प्रसूती झाली. त्यानंतर हे अर्भक मृत झाल्याचे कळताच गुप्तपणे धोंडिबा याने पुरुष जातीच्या अर्भकाला पिशवीत गुंडाळून हिरण्यकेशी नदीत सोडून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची फिर्याद पोलिसपाटील ईश्‍वर कांबळे यांनी पोलिसांत दिली होती. याप्रकरणी कुंभार दाम्पत्यासह वनिताचे वडील लक्ष्मण कुंभार (रा. उत्तूर, ता. आजरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हे वाचा - वादळ घरात घुसलं, पाळण्यातील बाळ डोळ्यादेखत उडून गेलं 

संशयित धोंडिबा याची चौकशी केल्यानंतर अर्भकाला नदीत नव्हेतर नदीकाठच्या मळवी नावच्या जमिनीत पुरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काल दुपारी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह पोलिस पथक आणि महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया खन्ना व आरोग्य पथकाच्या उपस्थितीत पंचासमक्ष मृतदेह उकरून काढला. अर्भकाला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्या वेळी हे अर्भक मुलीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, वनिता गरोदर असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे होती. प्रसूतीची तारीख जवळ आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी धोंडिबाकडे विचारपूस केली असता वनिताला प्रसूतीसाठी माहेरी उत्तूरला पाठविल्याचे व बाळ मृत झाल्याचे सांगितले होते. धोंडिबाने दिलेली माहिती व चर्चा यात तफावत आढळल्याने आरोग्य खात्याने संशय व्यक्त केला आणि ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली.

हे वाचा - देवरुख येथे बिबट्या पडला विहिरीत... मग त्याला वाचवलं असं...

बनावातून खुनाची उकल
धोंडिबा व वनिता या दाम्पत्याला पहिल्या तीनही मुलीच आहेत. त्या सातवी, पाचवी व बालवाडीत शिकतात. चौथा मुलगा झाला आणि तो मृत झाला, अशी फिर्याद दाखल झाली; परंतु काल हे अर्भक स्त्री जातीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच धोंडिबाने अर्भकाच्या लिंगाची माहितीही लपविल्याचे सिद्ध होते. अर्भक मृत झाल्याची कल्पनाही त्याने कुणाला दिली नाही. वानिताची प्रसूतीही घरीच केली. शिवाय अर्भक नदीत फेकल्याचे फिर्यादीत नमूद असून प्रत्यक्षात अर्भकावर दफनविधी केल्याचेही निष्पन्न झाले. यातून धोंडिबा खोटे बोलत असल्याचा संशय येत होता. हाच धागा पकडून त्यादृष्टीने धोंडिबाची कसून चौकशी केल्यानंतर हत्याच असल्याचे स्पष्ट होत असल्याने गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

गावकऱ्यांचा रोष
कुंभार दाम्पत्य मुळचे आजरा तालुक्‍यातील भादवनवाडीचे आहे. धोंडिबाचा व्यवसाय विटा तयार करण्याचा. काल दुपारी त्याला पोलिस घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांचा प्रचंड रोष पाहायला मिळला. गावचा लौकिक धुळीला मिळवल्याचा संताप गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. धोंडिबाच्या या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father killed daughter in gadhinglaj kolhapur